श्रीरामासाठी गुजरातच्या कुटुंबाकडून ६ किलोचा सोने-हिरेजडित मुकुट अर्पण, किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 10:00 PM2024-01-22T22:00:23+5:302024-01-22T22:01:31+5:30
ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मालक मुकेश पटेल यांनी अयोध्येच्या मंदिरात विराजमान असलेल्या प्रभू श्री रामाला काही दागिने अर्पण करण्याचा विचार केला होता
अयोध्या - २२ जानेवारी हा अयोध्येच्या इतिहासातील ऐतिहासिक दिवस आहे. रामजन्मभूमीवर बांधलेल्या राम मंदिरात भगवान रामललाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावेळी गुजरातच्या सूरत येथील एका हिरे व्यावसायिकाने अयोध्येतील प्रभू रामाला ११ कोटी रुपयांचा मुकुट दान केला आहे. हिरे व्यावसायिक आपल्या कुटुंबासह अयोध्याराम मंदिरात मुकुट दान करण्यासाठी अयोध्येला पोहोचले होते.
सुरतचे हिरे व्यापारी मुकेश पटेल यांनी त्यांच्या ग्रीन लॅब डायमंड कंपनीत भगवान रामलला यांच्यासाठी सोने, हिरे आणि नीलमांनी जडलेला ६ किलो वजनाचा मुकुट तयार केला आहे. त्याची किंमत ११ कोटी रुपये आहे. मुकेश पटेल प्राणप्रतिष्ठा सोहळ्याआधी त्यांच्या कुटुंबासह अयोध्येला मुकुट सादर करण्यासाठी पोहोचले होते. यानंतर २२ जानेवारी रोजी रामललासाठी तयार केलेला सोन्याचा हिऱ्याचा मुकुट श्री रामजन्मभूमी तीर्थ ट्रस्टला सुपूर्द करण्यात आला.
ग्रीन लॅब डायमंड कंपनीचे मालक मुकेश पटेल यांनी अयोध्येच्या मंदिरात विराजमान असलेल्या प्रभू श्री रामाला काही दागिने अर्पण करण्याचा विचार केला होता. या विचारात पटेल यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी आणि कंपनीतील अधिकाऱ्यांसोबत सल्लामसलत केल्यानंतर, सोन्याने आणि इतर दागिन्यांनी जडलेला मुकुट श्री राम यांना अर्पण करण्याचा निर्णय घेतला अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश भाई नावडिया यांनी सांगितले. प्रभू रामललाच्या मूर्तीसाठी मुकुटाचे मोजमाप करण्यासाठी कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना अयोध्येला पाठवण्यात आले होते. मूर्तीचे मोजमाप घेऊन कंपनीचे कर्मचारी सुरतला आले. यानंतर मुकुट बनवण्याचे काम सुरू करण्यात आले. ६ किलो वजनाच्या या मुकुटात ४ किलो सोने वापरण्यात आले आहे. यानंतर हिरे, माणिक, मोती, नीलम अशा लहान-मोठ्या आकारांची रत्ने जडवण्यात आली आहेत.
दरम्यान, सूरतमधील आणखी एक हिरे व्यापारी दिलिप कुमार व्ही. लाखी यांनीही राम मंदिराचे दरवाजे, गर्भगृह, त्रिशूळ, डमरू आणि खांब तसेच मंदिराच्या तळमजल्यावरील १४ सुवर्ण दरवाजांसाठी १०१ किलो सोने पाठविले आहे.सध्या सोन्याचा दर ६८ हजार रुपए प्रति १० ग्रॅम एढा आहे. यानुसार एक किलो सोन्या दर जवळपास ६८ लाख रुपए एवढा होतो. यानुसार एकूण १०१ किलो सोन्याची किंमत जवळपास ६८ कोटी रुपये एवढी होते.