अयोध्येत २२ जानेवारीला ११,००० व्हीआयपी ; मंदिराकडून सर्वांनाच मिळणार भेटवस्तू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 03:58 PM2024-01-10T15:58:24+5:302024-01-10T16:34:48+5:30
१२ जानेवारीपासूनच अयोध्येत रामभक्त पोहोचणा असून २२ जानेवारीपर्यंत ते अयोध्या नगरीत वास्तव्यास असणार आहेत
अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत असलेल्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिर उभारणीचा देशभरात उत्साह असून भाविकांचे डोळे अयोध्येकडे लागले आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून तब्बल ७ लाख भाविक अयोध्येत दाखल होणार आहेत. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते, सेलिब्रिटीही सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. या सोहळ्यासाठी तब्बल ११ हजार व्हीआयपी व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे. तर, संत, महात्मा आणि अयोध्येतील राम मंदिरासाठी संघर्ष करणारे कारसेवकही या सोहळ्यासाठी अयोध्येत येत आहेत.
१२ जानेवारीपासूनच अयोध्येत रामभक्त पोहोचणा असून २२ जानेवारीपर्यंत ते अयोध्या नगरीत वास्तव्यास असणार आहेत. सनातन सेवा न्यासकडून या व्यक्तींना रामजन्मभूमीशी निगडीत स्मृतीचिन्ह दिले जाईल. प्रभू श्रीराम यांच्याशी संबंधित हे स्मृतीचिन्ह अतिशय खास असणार आहे. सनातन सेवा न्यासचे संस्थापक आणि जगदगुरू भद्राचार्य यांचे शिष्य शिव ओम मिश्रा यांनी सांगितले की, अतिथी देवो भवं, म्हणजे अतिथींना देव मानले जाते. त्यामुळेच, अयोध्येत येणाऱ्या पाहुण्यांसाठी प्रभू श्रीराम यांचे स्मृतीचिन्ह बनविण्यात आले आहे. हे स्मृतीचिन्हा ११,००० पाहुण्यांना भेट म्हणून दिले जाईल. यासोबत प्रसादही देण्यात येणार आहे.
शिव ओम मिश्रा यांनी ते स्मृतीचिन्ह दाखवून पुढे सांगितले की, पाहुण्यांना दोन बॉक्स दिले जाणार आहेत. त्यापैकी, एका बॉक्समध्ये प्रसाद असणार आहे. त्यात बेसनचा लाडू, रामानंदी प्रथेनुसार लावण्यात येणारी विभूतही असणार आहे. तर, दुसऱ्या बॉक्समध्ये प्रभू श्रीराम यांच्याशी संबंधित साहित्य असणार आहे. राम मंदिर भूमीपूजन सोहळ्यावेळी जी माती मंदिराच्या गर्भगृहातून काढण्यात आली होती, ती माती यातील एका डब्बीत असणार आहे. तसेच, शरयू नदीचं पाणीही स्मृतीचिन्हासोबत पॅकेटबंद स्वरुपात देण्यात येणार आहे. एक चांदीचा शिक्का आणि ब्रास थाळीही असणार आहे. हे दोन्ही बॉक्स एकत्रितपणे ठेवण्यासाठी पिशवीही तयार करण्यात आली आहे. ज्या पिशवीवर राम मंदिराचा इतिहास आणि त्यासाठीच्या संघर्षांची माहिती लिहिण्यात आली आहे.
दरम्यान, सनातन सेवा न्यासला या कामाची जबाबदारी अगोदरपासूनच देण्यात आली आहे. त्यामुळे, अगोदरपासूनच याची तयारी सुरू असून ११,००० पेक्षा अधिक बॉक्स तयार करण्यात आले आहेत. अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याची आठवण कायमस्वरुपी या स्मृतीचिन्हाच्या माध्यमातून सोबत राहमार आहे.