भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 01:15 PM2024-06-01T13:15:25+5:302024-06-01T13:16:16+5:30
बंदुका, ताकदीच्या जोरावर राजकारणी, माफिया, बिल्डर हे मोक्याच्या जमिनी लाटत असतात. याला प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही साथ असते. हा प्रकार समोर आल्यावर ज्याची ती जमीन असते त्याला मात्र कुठेच न्याय मिळत नाही. असाच प्रकार भारतीय क्रिकेटपटू सोबत घडला आहे.
भारतात भूमिफियांनी जमिनी लुबाडण्याचे प्रकार काही नवीन नाहीत. बंदुका, ताकदीच्या जोरावर राजकारणी, माफिया, बिल्डर हे मोक्याच्या जमिनी लाटत असतात. याला प्रशासकीय अधिकाऱ्यांचीही साथ असते. हा प्रकार समोर आल्यावर ज्याची ती जमीन असते त्याला मात्र कुठेच न्याय मिळत नाही. असाच प्रकार भारताची महिला क्रिकेटपटू अर्जुन पुरस्कार प्राप्त पूनम यादव हिच्यासोबत घडला आहे.
पूनम यादव हिचे वडील रघुवीर सिंह हे आता या करोडो रुपयांच्या जमिनीसाठी सरकारी कार्यालयांचे खेटे घालत आहेत. ३० मे रोजी सुनावणी आणि ३१ मे रोजी प्लॉट ताब्यात देण्यात आला. त्यांची दीड कोटी रुपयांची जमीन कागदोपत्री गायब करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पूनम यादव ही सध्या रेल्वेज वुमन्स क्रिकेट टीमची कप्तान आहे. तिने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी तीने फतेहाबाद कुंडोलमध्ये दीड कोटींना जमीन खरेदी केली होती. ही जमीन तिने कपिल यादव यांच्याकडून घेतली होती. रजिस्ट्रीनंतर लेखापालाने तिचा नावावर जमीन चढविण्याचा अर्ज बाद केला. या जमिनीवर होळीच्या दिवशी कोणीतरी टाळे ठोकून जमीन ताब्यात घेतल्याचे कारण देण्यात आले. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर आम्हाला परत ही जमीन मिळाली होत, असे पूनमने म्हटले आहे.
लेखापालाने भूमाफियांशी संगनमत करून त्यांच्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप पूनम यादव हिच्या वडिलांनी केला आहे. आपल्या नावावर असलेली जमीन कागदपत्रांमधून गायब करण्यात आली आहे. याबाबत विभागीय आयुक्त रितू माहेश्वरी यांच्याकडे तक्रार केली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु अद्याप कोणतीही तक्रार आली नसल्याचे विभागीय आयुक्तांचे म्हणणे आहे. डीएम कार्यालयात तक्रार केली असण्याची शक्यता आहे. ही बाब माझ्या निदर्शनास आल्यास चौकशी केली जाईल, असे माहेश्वरी यांनी स्पष्ट केले आहे.
परस्पर विरोधी तक्रारी...
ज्या लोकांनी हे केले आहे त्यांनी देखील पूनम यादव आणि तिच्या वडिलांवर जमीन बळकावल्याचा आरोप केला आहे. या प्लॉटवर ३१ मे रोजी नोटीस चिकटविण्यात आली. याची सुनावणी ३० मे रोजी होती. जमिनीच्या कागदपत्रांसह पूनम यादव आणि तिच्या वडिलांना बोलावण्यात आले होते.