सासरहून २१,००० पुजारी; १४ ते २५ जानेवारी दरम्यान शरयूच्या तीरावर करणार ‘श्री राम नाम महायज्ञ’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 01:21 PM2024-01-13T13:21:32+5:302024-01-13T13:22:38+5:30

श्री राम नाम महायज्ञाची तयारी पूर्ण झाल्याचे  महात्यागी यांनी सांगितले

21,000 priests from father-in-law; 'Shri Ram Naam Mahayagya' will be performed on the banks of Sharyu between 14th and 25th January. | सासरहून २१,००० पुजारी; १४ ते २५ जानेवारी दरम्यान शरयूच्या तीरावर करणार ‘श्री राम नाम महायज्ञ’

सासरहून २१,००० पुजारी; १४ ते २५ जानेवारी दरम्यान शरयूच्या तीरावर करणार ‘श्री राम नाम महायज्ञ’

अयोध्या : अयोध्येत २२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी १४ ते २५ जानेवारी दरम्यान शरयूच्या तीरावर ‘श्री राम नाम महायज्ञ’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. महायज्ञ करण्यासाठी २१,००० पुजारी प्रभू रामाचे सासर असलेल्या नेपाळ येथून अयोध्येला पोहोचणार आहेत. राम मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या शरयू नदीच्या रेत घाटावर १०० एकरांत १००८ तंबूंची टेंट सिटी बांधण्यात आली असून, ११ थरांचा यज्ञमंडप बांधण्यात येत आहे.

मूळचे अयोध्येचे आणि नेपाळमध्ये स्थायिक झालेले आत्मानंद दास महात्यागी या महायज्ञाचे नेतृत्व करणार आहेत. दरवर्षी मकर संक्रांतीला ते यज्ञ करतात असे त्यांनी सांगितले.  या श्री राम नाम महायज्ञाची तयारी पूर्ण झाल्याचे  महात्यागी यांनी सांगितले.

कमाई ४० रुपये, २० रुपये देगणीसाठी अन्...

छत्तीसगडमधील गरिआबंद जिल्ह्यातील राजीम येथील बिदुलाबाई देवर (८५) यांना अभिषेक सोहळ्याचे आमंत्रण पाठवण्यात आले आहे, त्यांनी २०२१ मध्ये राम मंदिराच्या बांधकामासाठी २० रुपये दान केले होते. रोजंदारीवर काम करणाऱ्या या सफाई कामगाराची रोजची कमाई फक्त ४० रुपये आहे. म्हणजे त्यांनी दिवसाच्या कमाईतील अर्धा भाग दान केला. छत्तीसगडच्या नरहरपूर येथील संतोषीबाई यांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्यांनी सुमारे ६०० पोस्टमॉर्टेममध्ये मदत केली आहे.

दररोज एक लाख भाविकांना अन्नदान

१०० कुंडांमध्ये ११०० जोडपी राम मंत्रांच्या उच्चारासह हवन करतील. शेवटच्या दिवशी शरयू नदीत १००८ शिवलिंगांचे विसर्जन होईल. नेपाळी बाबांनी सांगितले की, दररोज ५० हजार भाविकांच्या राहण्याची व्यवस्था  आहे. दररोज सुमारे एक लाख भाविकांना अन्नदान केले जाईल.

सर्वाधिक देणगी नेमकी कुणी दिली?

राम मंदिरासाठी आतापर्यंत ५,५०० कोटी रुपयांहून अधिकची देणगी मिळाली आहे. ज्या व्यक्तीने सर्वाधिक देणगी दिली ती कोणी उद्योगपती, व्यापारी किंवा राजकारणी नसून रामकथा वाचक मोरारी बापू आहेत. त्यांनी मंदिराच्या बांधकामासाठी ११.३ कोटी रुपयांचे योगदान दिले.

१,००८ नर्मदेश्वर शिवलिंगांची स्थापना

  • यंदा राम मंदिर अभिषेक सोहळ्याला भव्य स्वरूप दिले जात आहे. १४ जानेवारीला महायज्ञाच्या पहिल्या दिवशी यजमानांचे मुंडन करण्यात येणार आहे. 
  • महायज्ञादरम्यान १७ जानेवारीपासून रामायणाच्या २४ हजार श्लोकांच्या जपाने हवन सुरू होईल, जे २५ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
  • महायज्ञासाठी १,००८ नर्मदेश्वर शिवलिंगांची स्थापना करण्यात येणार आहे.
  • या शिवलिंगांच्या निर्मितीसाठी मध्य प्रदेशातील नर्मदा खोऱ्यातून दगड आणण्यात आले आहेत. यज्ञ तयारीचे काम १४ जानेवारीला पूर्ण होणार आहे. 

Web Title: 21,000 priests from father-in-law; 'Shri Ram Naam Mahayagya' will be performed on the banks of Sharyu between 14th and 25th January.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.