गंगेत पवित्र स्नानासाठी निघालेल्या ७ बालकांसह २४ जणांना जलसमाधी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2024 07:34 AM2024-02-25T07:34:17+5:302024-02-25T07:34:32+5:30
उत्तर प्रदेशात अपघात; ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून तलावात कोसळली
कासगंज : उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यामध्ये शनिवारी सकाळी एक ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून ती एका तलावात पडली. पटियाली-दरियावगंज रस्त्यावर झालेल्या या दुर्घटनेत ट्रॅक्टर-ट्रॉलीतील सात बालकांसह २४ जणांचा मृत्यू झाला. हे सर्व लोक गंगा नदीवर पवित्र स्नानासाठी चालले होते. तसेच पंधरा ते वीस जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, चालक दुसऱ्या वाहनाच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना ही ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून एका तलावात पडली. सात बालके, आठ महिलांसह पंधरा जणांचा मृत्यू झाला. जैथारा येथून या लोकांनी प्रवासाला सुरुवात केली होती.
या दुर्घटनेतील मृतांची शवचिकित्सा केल्यानंतर ते मृतदेह नातेवाइकांच्या हवाली करण्यात आले.
ट्रॅक्टर-ट्रॉली उलटून झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी सर्व व्यवस्था करा, असे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. या घटनेचे वृत्त समजतात परिसरातील नागरिकांना तलावाभोवती एकच गर्दी केली होती. पोलिसांनी मदतकार्यात परिसरातील नागरिकांची मदत घेतली. (वृत्तसंस्था)
सरकारकडून प्रत्येकी २ लाखांची मदत
अपघातातील मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमी व्यक्तींना प्रत्येकी ५० हजारांची मदत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केली.