२.५ कोटींची जमीन, अन् गेले सहा जीव; उत्तर प्रदेशात घडले भीषण हत्याकांड
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 06:00 AM2023-10-03T06:00:22+5:302023-10-03T06:00:54+5:30
या घटनेवर शोक व्यक्त करीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडू नका, अशा कडक सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
राजेंद्र कुमार
देवरिया :उत्तर प्रदेशच्या देवरिया जिल्ह्यात अडीच कोटी रुपयांच्या जमिनीवरून दोन गटात झालेल्या वादात एकाच कुटुंबातील पाच आणि अन्य एक अशा सहा जणांची हत्या झाल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेवर शोक व्यक्त करीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडू नका, अशा कडक सूचना पोलिसांना दिल्या आहेत.
पोलिस अधीक्षक (एसपी) संकल्प शर्मा यांनी सांगितले की, सत्य प्रकाश दुबे (वय ५४), त्यांची पत्नी किरण (५२), मुलगी सलोनी (१८), नंदिनी (१०) व मुलगा गांधी (१५) यांची आज सकाळी ६ वाजता रुद्रपूर पोलिस स्टेशन हद्दीतील फतेहपूर गावात हत्या करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रेम यादव (५०) यांना सत्य प्रकाश दुबे यांच्या गटातील लोकांनी बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेत सत्य प्रकाश दुबे यांचा मुलगा अनमोल हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नेमके काय घडले?
सत्य प्रकाश दुबे यांचा भाऊ साधू दुबे यांनी त्यांची जमीन प्रेम यादव यांना विकली.
यादव हे जमिनीवरील पिकाची कापणी करण्यास गेले, तेव्हा सत्य प्रकाश यांनी विरोध केला.
त्यातून झालेल्या वादात यादव समर्थकांनी सत्यप्रकाश यांच्या घरात घुसून हत्याकांड घडवले.