'बकरी ईद' दिवशीच २५० बकऱ्यांना जीवदान; जैन बांधवांच्या कार्याचं होतंय कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 05:52 PM2023-06-30T17:52:58+5:302023-06-30T18:01:04+5:30
कुर्बाणी देण्यासाटी आणलेल्या तब्बल २५० बकऱ्यांना जैन समाजाने जीवनदान दिले आहे
मुस्लीम धर्मीयांचा पवित्र उत्सव म्हणून बकरी ईद जगभरात साजरा केला जातो. या सणाला मुस्लीम बांधवांकडून बकरे कापून कुर्बाणी दिली जाते. गुरुवारी महाराष्ट्रात पवित्र आषाढी एकादशी असल्याने मुस्लीम बांधवांनी कुर्बाणी देण्याचं टाळलं होतं. मात्र, सर्वत्र आज बकरी ईदसाठी कुर्बाणी दिली जात आहे. उत्तर प्रदेशच्या बागपत जनपद येथे बकरी ईदच्या दिवशी पशुप्रेमाचं वेगळंच उदाहरण पाहायला मिळालं. येथील अमीनगर परिसरात ईद उल-अजहवर वेगवेगळ्या ठिकाणी कुर्बाणीसाठी २५० बकरे कुर्बाणीसाठी आणण्यात आले होते.
कुर्बाणी देण्यासाटी आणलेल्या तब्बल २५० बकऱ्यांना जैन समाजाने जीवनदान दिले आहे. जीव दया संस्थेच्या बकरशाळेत या सर्वच बकऱ्यांना ठेवण्यात आलं. तसेच, या बकऱ्यांच्या पालन-पोषणासाठी जैन बांधवांनी रोख स्वरुपात निधीही दिला. येथील अमीनगर सराय परिसरात जैन समाजाची जीव दया संस्थेची बकरशाळा सन २०१६ पासून कार्यरत आहे. येथे बकऱ्यांचा सांभाळ केला जातो. चारा आणि औषधोपचारही केले जातात.
ईद उल अजहा म्हणजे बकरी ईदच्या मुहूर्तावर वेगवेगळ्या ठिकाणी २५० हून अधिक बकऱ्यांची कुर्बाणी दिली जाणार होती. मात्र, जैन समाजातील बांधवांनी या सर्वच बकऱ्यांना खेरदी केले आणि बकरशाळेत आसरा दिला. त्यामुळे, या बकऱ्यांना जीवनदान मिळालं. बकरशाळेचे प्रमुख विनोद जैन व विरेंद्र जैन यांनी सांगितले की, दरवर्षी ईदच्या अगोदर देभरातील जैन समाजाचे लोक बकरे खरेदी करुन जीवनदान देण्याचं काम करतात. त्या बकऱ्यांना बकरशाळेत जमा केलं जातं. गेल्या १० दिवसांत आमच्या बकरशाळेत २५० पेक्षा अधिक बकरे आणण्यात आले आहेत. ज्यांची एकूण किंमत २० लाख रुपयांपेक्षाही अधिक आहे, सध्या या बकरशाळेत ४५० पेक्षा जास्त बकरे आहेत.