२५,००० जवान, स्नायपर अन् कडक बंदोबस्त; अयोध्येत सुरक्षेसाठी AI चीही मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 04:58 PM2024-01-06T16:58:53+5:302024-01-06T16:59:33+5:30
रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने अंतिम टप्प्यात तयारी सुरू आहे.
नवी दिल्ली - देशभरात २२ जानेवारी रोजी दिवाळी साजरी करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना केलं आहे. अयोध्येतील राम मंदिरात त्याच दिवशी प्राणप्रतिष्ठा सोहळा होऊन अयोध्येच्या राम मंदिराचं लोकार्पण होईल. देशभरातून भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत. तर, पंतप्रधानांसह अनेक मंत्री, मुख्यमंत्री, सेलिब्रिटी, उद्योगपती आणि दिग्गज मान्यवरांची मांदियाळीच या सोहळ्याला जमणार आहे. त्यादृष्टीने सरकारकडून कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. त्यासाठी, स्नायपर ते एनएसजी कमांडोही तैनात आहेत.
रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या अनुषंगाने अंतिम टप्प्यात तयारी सुरू आहे. मंदिराचे उर्वरीत बांधकाम आणि सजावटीकडे प्रधान्यक्रमाने पाहिलं जात असून संपूर्ण अयोध्या नगरी उजळून निघत आहे. तर, दुसरीकडे सुरक्षा यंत्रणाही अलर्ट मोडवर असून कडक बंदोबस्त तैनात केला जात आहे. अयोध्येला सुरक्षेच्या कारणास्तव काही झोनमध्ये विभागलं जात आहे. रेड आणि यलो झोन करण्यात आले असून ड्रोनच्या देखरेखीखाली अयोध्या नगरी असणार आहे. येथील पोलिसांनी आर्टीफिशियल इंटेलिजन्सच्या डेटाबेसवर काम करणाऱ्या अनेक कंपन्यांसोबत संपर्क केला आहे. त्या माध्यमातून येथील सुरक्षा अधिक मजबूत आणि सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राम मंदिर सुरक्षेची जबाबदारी युपी एसटीएफसह केंद्रीय सुरक्षा दलांकडे देण्यात आली आहे. अयोध्या नगरीला रेड आणि यलो झोनमध्ये विभागण्यात आलं आहे. ६ कंपनी सीआरपीएफ, ३ कंपनी पीएसी, ९ कंपनी एसएसएफ, ३०० पोलीस कर्मचारी, ४७ जवान फायर सर्व्हीस, ३८ जवान, ३८ जवान एल आय यू, ४० जवान रेडिओ पुलिस, दोन बॉम्ब शोधक पथके, एक कमांडो युनिट पीएसी, एक युनिट एसटीएफ, तसेच, केंद्रीय तपास यंत्रणांसह एनएसजी कमांडोही तैनात असणार आहेत. श्रीराम जन्मभूमीच्या सुरक्षेसाठी तब्बल २५००० जवान अयोध्येत असणार आहेत. त्यामध्ये, भारतीय सैन्य दलाचे जवानही असतील.