रेल्वेच्या अधिकाऱ्याकडे २.६१ कोटींचे घबाड, इतर अधिकाऱ्यांची उडाली झोप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 06:40 AM2023-09-14T06:40:52+5:302023-09-14T06:41:45+5:30
Crime News: उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील रेल्वेचे प्रधान मुख्य साहित्य व्यवस्थापक आणि १९८८ च्या बॅचचे इंडियन रेल्वे स्टोअर सर्व्हिस (आयआरएसएस) अधिकारी केसी जोशी यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने त्यांना तीन लाखांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली
गोरखपूर : उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथील रेल्वेचे प्रधान मुख्य साहित्य व्यवस्थापक आणि १९८८ च्या बॅचचे इंडियन रेल्वे स्टोअर सर्व्हिस (आयआरएसएस) अधिकारी केसी जोशी यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयने त्यांना तीन लाखांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला असता त्यांच्या घरातून तब्बल २.६१ कोटी रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे.
सीबीआयला छापेमारीत अनेक संशयास्पद कागदपत्रेही सापडली आहेत. त्यानंतर सीबीआयने त्याचा संगणक आणि हार्डडिस्क ताब्यात घेतली आहे. सीबीआयच्या चौकशीदरम्यान केसी जोशी यांनी अनेक धक्कादायक खुलासे करून रेल्वे अधिकाऱ्यांची झोप उडवली आहे. आरोपी के. सी. जोशी यांनी रेल्वेत सुरू असलेल्या लाचखोरीत इतरांचीही नावे घेतली आहेत.
कमिशनशिवाय कोणतेच काम नाही...
रेल्वेमध्ये कोणतेही कंत्राट किंवा टेंडर कमिशनशिवाय होत नाही. ज्यात खालपासून वरपर्यंतच्या अधिकाऱ्यांचे कमिशन
ठरलेले असते. कमिशन मिळाल्यानंतरच टेंडर आणि कंत्राट दिले जाते,
असे त्यांनी सीबीआयला सांगितले आहे. त्यामुळे सीबीआय आता याप्रकरणी अन्य अधिकाऱ्यांची चौकशी करण्याच्या तयारीत
आहे. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.