हृदयद्रावक! रुग्णवाहिकेच्या भीषण अपघातात एकाच वेळी ४ कुटुंब उद्ध्वस्त झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 02:18 PM2023-07-29T14:18:46+5:302023-07-29T14:19:18+5:30
पहाटे ५ च्या सुमाराम रुग्णवाहिका कोतवालीच्या तुसरौर गावाजवळ पोहचली. तेव्हा अज्ञात वाहनाने रुग्णवाहिकेला धडक दिली
उत्तर प्रदेशच्या उन्नाव इथं हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी वृद्ध पतीनं जगाचा निरोप घेतल्यानंतर पत्नी आणि ४ मुली त्यांचा मृतदेह घेऊन रुग्णवाहिकेतून परतत होत्या. त्यावेळी तुसरौर गावाजवळ वेगवान रुग्णवाहिकेने एका वाहनाचा जोरदार धडक दिली. या अपघातात पत्नी आणि ३ मुलींचा मृत्यू झाला तर १ मुलगी गंभीर अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. तिच्यावर कानपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर रुग्णवाहिका चालक फरार झाला आहे.
मौरावा येथील धनीराम सविता हे सेवानिवृत्त कर्मचारी होते. २००७ मध्ये ते निवृत्त झाले. एक आठवड्यापूर्वी त्यांना पॅरेलिसिसचा झटका आला. कुटुंबाने त्यांना दवाखान्यात दाखल करून उपचार सुरू केले. श्वास घेण्यास अडचण येत असल्याने २४ जुलैला कुटुंबाने त्यांना जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर तिथून कानपूरच्या हॅलेटमध्ये रेफर केले. शुक्रवारी सकाळी धनीराम यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पत्नी प्रेमा, मुलगी मंजुळा, अंजली, रुबी आणि सुधा रुग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह गावी घेऊन जात होते.
पहाटे ५ च्या सुमाराम रुग्णवाहिका कोतवालीच्या तुसरौर गावाजवळ पोहचली. तेव्हा अज्ञात वाहनाने रुग्णवाहिकेला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, रुग्णवाहिकेचे तुकडे उडाले. या अपघातात प्रेमा, मंजुळा, अंजली आणि रुबी यांचाही मृत्यू झाला. सुधा यांना गंभीर अवस्थेत नातेवाइकांनी कानपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
एसपी सिद्धार्थ शंकर मीणा यांनी सांगितले की, हा अपघात ज्या प्रकारे झाला त्यावरून ओव्हरटेक करताना वाहन धडकल्याचा अंदाज आहे. धडकलेल्या वाहनाचा शोध घेण्यात येत आहे. रुग्णवाहिका चालकाची चूक आणि भरधाव वेग यामुळे चार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तीन मुलींच्या मृत्यूमुळे कुटुंबासह पाच मुलांपासून आईची ममता हिरावली गेली. त्याचवेळी आजाराने वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वृद्ध पत्नीचाही अपघातात मृत्यू झाला.
एकाच ठिकाणी आई-वडील आणि दोन मुलींवर अंत्यसंस्कार
रस्ते अपघातात चार आणि आजारी पडून वडिलांचा मृत्यू, या सर्वांचे मृतदेह सायंकाळी उशिरा गावात आणण्यात आले. वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या दोन मुलींवर बाशा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर एका मुलीवर शुक्लागंजमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.