राम मंदिरासाठी 400 किलोचे कुलूप; ‘कुलूपनगरी’च्या कारागिराचे ‘भारी’ काम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2023 06:35 AM2023-08-07T06:35:11+5:302023-08-07T06:35:23+5:30
अलीगड : अयाेध्येतील श्री राम मंदिराचे काम वेगाने सुरू आहे. आकर्षक बांधकाम, गाभाऱ्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना इत्यादींवर भर देण्यात आला ...
अलीगड : अयाेध्येतील श्रीराम मंदिराचे काम वेगाने सुरू आहे. आकर्षक बांधकाम, गाभाऱ्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना इत्यादींवर भर देण्यात आला आहे. ऐतिहासिक ठरणाऱ्या मंदिरासाठी वैशिष्ट्यपूर्ण असे जगातील सर्वाधिक वजनाचे कुलूपही बनविण्यात आले आहे. तब्बल ४०० किलो वजनाचे हे कुलूप असून, अलीगड येथील कुलूप बनविणारे सत्य प्रकाश शर्मा यांनी ते बनविले आहे.
अलीगड ही ‘कुलूपनगरी’ म्हणून ओळखली जाते. शर्मा यांनी सर्वाधिक वजनाचे हस्तनिर्मित कुलूप बनविण्यासाठी अनेक महिने परिश्रम घेतले. गेल्या अनेक दशकांपासून त्यांचे कुटुंबीय कुलूप बनविण्याच्या व्यवसायात आहे. श्रीराम मंदिराचा विचार करून त्यांनी खास
कुलूप बनविले.
कुलूप अलीगडमधील एका प्रदर्शनात सर्वप्रथम दाखविण्यात आले हाेते. आता त्याला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. कुलूप बनविण्यासाठी त्यांच्या पत्नी रुक्मिणी यांनी खूप मदत केली. सुरुवातीला सहा फूट उंच कुलूप बनविले हाेते. मात्र, त्यापेक्षा माेठे कुलूप बनवावे, असे काही जणांनी सुचविले. त्यामुळे आम्ही हे कुलूप बनविले, असे रुक्मिणी यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
सुमारे दाेन लाख रुपये खर्च कुलुपासाठी झाला आहे.
आमचे शहर कुलुपांसाठी ओळखले जाते. म्हणूनच मंदिरासाठी एक माेठे कुलूप बनविण्याचा विचार केला.
- सत्य प्रकाश शर्मा,
कुलूप बनविणारे.