दिग्गजांना पाठविलेल्या निमंत्रण पत्रिकेसोबत दिल्या आहेत ५ भेटवस्तू; हिंदी-इंग्रजी भाषेतही आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 01:26 PM2024-01-05T13:26:08+5:302024-01-05T13:26:21+5:30
ही पत्रिका हिंदी व इंग्रजी भाषेत असून, त्यासोबत पाच भेटवस्तूही देण्यात आल्या आहेत.
अयोध्या : श्री राम मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला अयोध्येत रंगणार आहे. त्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह ७ हजार जणांना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांना विशेष निमंत्रण पत्रिका पाठविण्यात आली आहे. ही पत्रिका हिंदी व इंग्रजी भाषेत असून, त्यासोबत पाच भेटवस्तूही देण्यात आल्या आहेत.
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने खास ही पत्रिका तयार केली आहे. निमंत्रण पत्रिकेच्या मुखपृष्ठावर इंग्रजीत ‘इन्व्हिटेशन एक्स्ट्राऑर्डिनायर’ आणि हिंदीत ‘अपूर्व अनादिक निमंत्रण’ असे नमूद केले आहे. अतिशय आकर्षक पद्धतीने ही पत्रिका डिझाइन केली असून, त्यावर प्रभू श्रीरामाचे बालपणीचे चित्र तसेच श्रीराम मंदिर यात्रेचा सारांश दिला आहे. तसेच पत्रिकेत सोहळ्याची संपूर्ण रूपरेषा तसेच क्यूआर कोड, याशिवाय पाहुण्यांना सोहळ्याला येण्याची वेळ, वाहन पार्किंगची जागा व अन्य माहिती दिली आहे.
कसा असेल सोहळा?
निमंत्रितांना या सोहळ्याला येण्यासाठी ११:३० वाजताची वेळ दिली आहे. १२:२० वाजता प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा शुभमुहूर्त आहे. त्यानंतर १२:३० वाजल्यानंतर प्रमुख मान्यवरांचे भाषण होईल. सोहळा संपल्यानंतर मंदिर उपस्थितांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.
राम-सीतांनाही दिले निमंत्रण
‘रामायण’ मालिकेत प्रभू श्रीराम आणि सीतेची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल व अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनाही निमंत्रित केले आहे.
५० कारसेवकांचे नातेवाइकही येणार
श्री राम जन्मभूमी आंदोलनात प्राणास मुकलेल्या ५० कारसेवकांच्या नातेवाइकांना या सोहळ्यासाठी निमंत्रित केल्याचे ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी सांगितले. त्याशिवाय ७ हजार मान्यवरांना पत्रिका पाठविल्याचे सांगितले.
पत्रिकेत काय काय दिले?
- अयोध्यात निर्माणाधीन श्रीराम मंदिराचे छायाचित्र असलेले कार्ड तसेच त्यावर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचा लोगो छापला आहे. एका छोट्या लिफाफ्यात पिवळ्या अक्षता दिल्या आहेत.
- प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी येण्यासाठी वाहन पास, तसेच पार्किंगस्थळी पोहोचण्यासाठी गूगल मॅपचा क्यूआर कोड दिला आहे.
- १५२८ ते १९८४ पर्यंत श्रीराम जन्मभूमी आंदोलनाशी संबंधित २० प्रमुख व्यक्तींची माहिती असलेली संकल्प संपोषण पुस्तिका दिली आहे. त्यात देवरहा बाबा यांच्यापासून ते अशोक सिंगल यांचीही माहिती दिली.
- सोहळ्याच्या पत्रिकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास यांचा उल्लेख करण्यात आला आहे.