राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापूर्वी मोठा निर्णय! आता परिसराची सुरक्षा CRPF नाही, UP SSF सांभाळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 08:22 PM2023-09-14T20:22:22+5:302023-09-14T20:23:05+5:30
आता सीआरपीएफ राम मंदिराच्या परिसरात सुरक्षा देणार नाही. सीआरपीएफ गेल्या ३५ वर्षांपासून मंदिराची सुरक्षा सांभाळत आहे.
अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिर सुरक्षा समितीची बैठक गुरुवारी सायंकाळी झाली. बैठकीनंतर अयोध्या विभागाचे आयुक्त गौरव दयाल यांनी महत्त्वाची माहिती दिली. गौरव दयाल यांनी सांगितले की, रामजन्मभूमीची सुरक्षा आता यूपी एसएसएफ म्हणजेच उत्तर प्रदेश विशेष सुरक्षा दल हाताळेल. सीआरपीएफच्या जागी यूपी एसएसएफचे जवान तैनात केले जातील. एसएसएफचे जवान अयोध्येत पोहोचले असून त्यांचे एक आठवड्याचे विशेष प्रशिक्षण सुरू आहे. रामजन्मभूमी परिसरात एसएसएफसोबत पीएसी आणि सिव्हिल पोलिस कर्मचारीही तैनात असणार आहेत.
भयावह! गाझियाबादमध्ये बसचा भीषण अपघात; १५-२० प्रवासी जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
१६ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयुक्त गौरव दयाळ यांनी सांगितले. राम मंदिराच्या तळमजल्यावरील फिनिशिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पहिल्या मजल्यावरील बांधकामाचेही जवळपास ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. इतर बांधकामे वेगाने सुरू आहेत. आज रामजन्मभूमी मंदिर सुरक्षा समितीची बैठक पार पडली. एडीजी सिक्युरिटी एस प्रताप कुमार, एडीजी झोन पीयूष मोरदिया, सीआरपीएफचे अधिकारी आणि गुप्तचर संस्थांचे अधिकारीही बैठकीला उपस्थित होते.
सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी यूपी एसएसएफला कधी मिळणार याबाबत आयुक्त गौरव दयाल यांनी माहिती दिली नाही. ते बोलताना म्हणाले की, आता सीआरपीएफच्या जागी यूपी एसएसएफ तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रामजन्मभूमी सुरक्षा समितीची बैठक दर तीन महिन्यांनी बोलावली जाते. यूपी एसएसएफचे जवान दोन दिवसांपूर्वी अयोध्येत दाखल झाले आहेत.
याआधी रामजन्मभूमीच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ तैनात करण्यात आले होते. सीआरपीएफचे जवान सुमारे ३५ वर्षांपासून जन्मभूमीची सुरक्षा सांभाळत आहेत. रामजन्मभूमी सुरक्षा समितीची बैठक संपल्यानंतर अयोध्येचे आयुक्त गौरव दयाल यांचे विधान आले आहे की, सीआरपीएफची जागा घेतल्यानंतर आता जन्मभूमीची सुरक्षा उत्तर प्रदेश विशेष सुरक्षा दल म्हणजेच यूपी एसएसएफकडे सोपवली जाईल, त्याबाबत चर्चा होईल. सुरक्षा समितीच्या उच्च अधिकार्यांसह बैठक घेतली जाईल.
यूपी एसएसएफचे जवान सात दिवसांचे विशेष प्रशिक्षण घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात राम लल्लाच्या अभिषेक कार्यक्रमापूर्वीच रामजन्मभूमीच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. याबाबत सुरक्षेशी संबंधित अधिकारी रामनगरीतच ट्रस्टच्या अधिकाऱ्यांशी विचारमंथन करत आहेत.