वकिलांच्या ग्रुपची पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; पोलीस स्टेशनजवळ मोठा गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 03:51 PM2024-01-24T15:51:46+5:302024-01-24T15:53:28+5:30
वकिलांच्या ग्रुपने कलेक्ट्रेड पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांवरच हल्लाबोल केला.
लखनौ - पोलीस आणि वकिलांचा एकमेकांच्या प्रोफेशवरुन वाद होत असतो. कारण, पोलीस सापळा रचून, संकटात जाऊन आरोपींना पकडतात. मात्र, वकिल कायदेशीर मार्ग काढत त्याच आरोपींची सुटका करतात. अनेकदा या संबंधातून पोलीस आणि वकिलांची मैत्रीही होते, पण यातूनच दोघांमध्ये शाब्दीक वादही होत असल्याचं दिसून येतं. उत्तर प्रदेशातील महराजगंज येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आलेल्या वकिलांच्या ग्रुपने पोलिसांनाच मारहाण केल्याची घटना घडली.
वकिलांच्या ग्रुपने कलेक्ट्रेड पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांवरच हल्लाबोल केला. विशेष म्हणजे वकिलांची ही लढाई शाब्दीक न राहता त्यांनी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांना पळवून पळवून मारल्याचं उघडकीस आलं आहे. पीआय वकिलांपासून बचावासाठी पळत असताना खाली पडले. त्यावेळीस वकिलांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा गोंधळ उडाला.
एका पोलीस अधिकाऱ्याला मारहाण होत असल्याचे पाहून एसपी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील पोलीस मदतीला धावले. या पोलिसांनी पोलीस निरीक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. याप्रकरणी, बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असं पोलीस अधीक्षक सोमेंद्र मीना यांनी सांगितलं आहे.
जिल्हाधिकारी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी मारहाण प्रकरणात एका वकिलाविरुद्ध सीआरपीसी कलम १५१ अंतर्गत कारवाई केली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात आलेल्या वकिलासोबत पोलिसांकडून चुकीच्या पद्धतीने व्यवहार झाला. त्यावरुन, वकिलांनी एकत्र येत एसपी कार्यालयात जाऊन निवेदन दिले. त्यावेळी, एका तासाच चौकशी करुन योग्य ती कारवाई करू, असे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले होते. त्याचवेळी, संबंधित पोलीस निरीक्षक एसपी कार्यालयाकडे येताना पाहून वकिलांना राग अनावर झाला. त्यांना पाहून वकिलांनी गोंधळ घातला. त्यामुळे, पोलीस निरीक्षक आपल्या चौकीकडे मागे फिरले असता वकिलांनी त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी, तोल जाऊन ते खाली पडले असता पाठिमागून आलेल्या वकिलांनी त्यांच्यावर हात उगारला. काही वकिलांनी त्यांना मारहाण केल्याचंही व्हायरल व्हिडिओत दिसून येत आहे.
दरम्यान, याप्रकरणाची न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. आता, यावर काय कारवाई होणार हे पाहावे लागेल.