बाऊंसर ठेऊन टोमॅटो विक्री करणाऱ्या भाजीवाल्यास अटक, 'सपा'चा संताप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 05:06 PM2023-07-10T17:06:03+5:302023-07-10T17:10:46+5:30
वाराणसीतील या टोमॅटो विक्री प्रकरणी पोलिसांनी एका अज्ञातासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
वाराणसी - देशभरात टोमॅटोच्या किमती १६० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचल्यामुळे उत्तर प्रदेशच्या वाराणसीमधील एका भाजी विक्रेत्याने त्याच्या स्टॉलचे संरक्षण करण्यासाठी चक्क बाउन्सर ठेवले होते. मात्र, आता या भाजीविक्रेता दुकानदाराला बाऊंसर ठेवणं चांगलंच अंगलट आलं आहे. कारण, या भाजीविक्रेत्या दुकानाच्या मालकाला आणि त्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. तर, या दुकानातून भाजीविक्री करणाऱ्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.
वाराणसीतील या टोमॅटो विक्री प्रकरणी पोलिसांनी एका अज्ञातासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कलम २९५, १५३A, ५०५(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाराणसीतील सपा कार्यकर्त्याने टोमॅटोच्या दरवाढीवरुन अशाप्रकारे भाजीविक्रीचा घाट घातला होता. याचा व्हडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. स्वत: समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही हा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला होता. त्यामुळे, आता समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्याला केलेल्या अटकेविरुद्ध अखिलेश यादव यांनी योगी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, संबंधित भाजीविक्रेत्याला तात्काळ सोडून द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
दरम्यान, अजय फौजी नावाच्या भाजी विक्रेत्याने सांगितले की, लोक टोमॅटो घेताना वाद घालत आहेत. तसेच टोमॅटो देखील चोरी करत आहेत. आम्हाला आमच्या दुकानात कोणताही वाद नको म्हणून आम्ही दोन बाउन्सर नियुक्त केले आहेत. फौजी पुढे म्हणाले की, टोमॅटोच्या किमती अचानक वाढल्याने ग्राहकांनी टोमॅटोचा वापर कमी करण्यास सुरुवात केली आहे. टोमॅटो १६० रुपये किलोने विकले जात आहेत. लोक केवळ ५० किंवा १०० ग्रॅम विकत घेत आहेत.
फोनसोबत टोमॅटो फ्री
मध्य प्रदेशातील स्मार्टफोन दुकान मालकाने ग्राहकांना मोबाइल फोनसह टोमॅटो मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. दुकानाचे मालक अभिषेक म्हणाले की, आम्हाला ग्राहकांना ऑफर द्यायची होती. आम्ही स्मार्टफोनसह टोमॅटो मोफत देण्याचा निर्णय घेतला.