“होय, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले, पण जाणार नाही”: अखिलेश यादव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 09:04 AM2024-01-14T09:04:33+5:302024-01-14T09:07:18+5:30
Ayodhya Ram Mandir: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास हजेर न लावणाऱ्या नेत्यांमध्ये आता अखिलेश यादव यांची भर पडली आहे.
Ayodhya Ram Mandir: राम मंदिरात होणाऱ्या रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या लगबगीने वेग घेतला आहे. २२ तारीख जवळ येत आहे, तसे राजकारणही अधिक तापताना दिसत आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्यावरून विरोधकांमध्ये एकमत नसल्याचे दिसत नसले तरी काँग्रेस नेत्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला हजेरी लावण्यास नकार दिला आहे. यात आता समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांची भर पडली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळण्यावरून मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळत आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास हजेरी लावण्यावरून अखिलेश यादव यांनी काही विधाने केली होती. तसेच निमंत्रण मिळाले नसल्याचे म्हटले होते. यानंतर मात्र आता राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे, अशी कबुली अखिलेश यादव यांनी दिली. तसेच आमंत्रण मिळाले असले तरी या सोहळ्याला जाणार नाही, असे यादव यांनी स्पष्ट केले आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना पत्र लिहून तसे कळवले आहे.
अखिलेश यादव यांनी दिल्या सोहळ्यासाठी शुभेच्छा
अयोध्या येथील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी निमंत्रण दिल्याबद्दल हार्दिक धन्यवाद आणि समारंभ यशस्वीपणे पार पडण्यासाठी शुभेच्छा. या सोहळ्यानंतर आम्ही आमच्या कुटुंबासह नक्कीच येऊ. मिळालेल्या निमंत्रणासाठी पुन्हा धन्यवाद!, असे अखिलेश यादव यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीचे अनेक नेते राम मंदिराच्या सोहळ्याला जाणार नाहीत. ममता बॅनर्जी, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, अधीर रंजन चौधरी अशा अनेक नेत्यांचा या यादीत समावेश आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीही कार्यक्रमाला येण्यास नकार दिला आहे. हा भाजपाचा कार्यक्रम झाला आहे, त्यामुळे त्याला उपस्थित राहण्यात अर्थ नाही, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे.