कन्नौजमधून अखिलेश यादव लढणार निवडणूक, आज उमेदवारी अर्ज दाखल करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2024 09:18 AM2024-04-25T09:18:11+5:302024-04-25T09:19:50+5:30
Lok Sabha Election 2024 : कन्नौज लोकसभा मतदारसंघ हा समाजवादी पार्टीचा, विशेषतः यादव घराण्याचा बालेकिल्ला आहे.
कन्नौज : समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. अखिलेश यादव गुरुवारी दुपारी १२ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यापूर्वी समाजवादी पार्टीने अखिलेश यादव यांचा आपला पुतण्या तेज प्रताप यादव यांना या जागेवरून उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, कन्नौजमधील समाजवादी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी आणि जागा गमावण्याची शक्यता पाहता अखिलेश यादव यांनी स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
कन्नौज लोकसभा मतदारसंघ हा समाजवादी पार्टीचा, विशेषतः यादव घराण्याचा बालेकिल्ला आहे. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या सुब्रत पाठक यांनी डिंपल यादव यांचा पराभव करून निवडणूक जिंकली होती. यावेळीही भाजपाने सुब्रत पाठक यांना उमेदवारी दिली आहे. आता त्यांचा सामना अखिलेश यादव यांच्याशी होणार आहे. भाजपाचे उमेदवार सुब्रत पाठकही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
जाणकारांच्या मते, यंदाच्या लोकसभा निवडणकीत अखिलेश यादव आपल्या पारंपरिक जागांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच कुटुंबातील सदस्य असलेल्या पाच यादवांनाच तिकीट देण्यात आले आहे. समाजवादी पार्टीने अखिलेश यादव यांची पत्नी डिंपल यादव यांना मैनपुरीतून, भाऊ धर्मेंद्र यादव यांना आझमगडमधून, शिवपाल यादव यांचा मुलगा आदित्य यादव यांना बदायूंमधून आणि रामगोपाल यादव यांचा मुलगा अक्षय यादल यांना फिरोजाबादमधून तिकीट दिले आहे.
सुब्रत पाठक यांच्याकडून खरपूस समाचार
दरम्यान, सुब्रत पाठक यांनी कन्नौजमधून लढणाऱ्या अखिलेश यादव यांचा खरपूस समाचार घेतला आहे. ते म्हणाले की, अखिलेश यांचा घमंड तुटत आहे. कोणाशीही लढून जिंकण्याचा अखिलेश यादव यांचा घमंड आता तुटू लागला आहे. मी आधीच सांगत होतो की अखिलेश यांच्याशिवाय माझ्याविरुद्ध कोणीही लढू शकत नाही, जर तेज प्रताप लढले असते तर समाजवादी पार्टीचे ८० टक्के मतदार कार्यकर्ते माझेच झाले असते.