Akhilesh Yadav vs Yogi Adityanath: "DNAचा फुलफॉर्म तरी समजून घ्यायचा, माहिती असता तरीही..."; अखिलेश यांचा योगींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 05:46 PM2024-09-04T17:46:59+5:302024-09-04T17:47:52+5:30
Akhilesh Yadav vs Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे नाव घेता केली टीका
Akhilesh Yadav vs Yogi Adityanath: समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बुधवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'डीएनए' संबंधित टिप्पणीवर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी आरोप करण्यापूर्वी 'डीएनए'चा पूर्ण अर्थ समजून घ्यावा, असे ट्विट त्यांनी नाव न घेता केले. मुख्यमंत्र्यांचे नाव न घेता अखिलेश यादव म्हणाले की जे जास्त बोलतात, त्यांच्यावर जास्त टीकाही होते, त्यांनी जास्त ऐकण्याची सवय करुन घ्यावी.
मंगळवारी योगी आदित्यनाथ यांनी सपा वर निशाणा साधताना त्या पक्षाच्या 'डीएनए'मध्ये अराजकता आणि गुंडगिरीचा समावेश असल्याचे म्हटले होते. त्यामुळे राज्यातील जनतेसमोर संकट निर्माण झाले आहे असेही म्हटले होते. याला उत्तर देताना अखिलेश यादव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली."आरोप लावण्याआधी फुलफॉर्म तरी समजून घ्यायचा होता. DNA = Deoxyribonucleic Acid. तसंही माहिती असता तरीही बोलायला जमला नसता. खासदार-आमदारांचा स्वत:च्या पक्षात कोट्यवधी रुपये खर्च करून प्रवेश करुन घेणाऱ्या लोकांनी कमी बोलले तरच तेच योग्य ठरेल. जे खूप बोलतात, त्यांना खूप ऐकावंही लागतं."
याआधी मंगळवारी सीएम योगी आदित्यनाथ यांनी सपावर जोरदार हल्ला चढवला आणि म्हटले होते की, सपाच्या डीएनएमध्ये अराजकता आणि गुंडगिरी आहे. त्यांच्यामुळेच राज्यातील सामाजिक बांधणी बिघडली आहे. सपाच्या राजवटीत प्रत्येक कामाचा लिलाव होऊन राज्यात विकासकामांऐवजी लूटमारीचे वातावरण होते. सपा अध्यक्ष अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल सिंह यादव या दोघांवर योगींनी टीका केली. दरम्यान, अखिलेश यादव कन्नौजमधून खासदार झाल्यानंतर करहल विधानसभा जागा रिक्त झाली आहे. या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होणार आहे.