माकडांनी ३० दिवसांत ३५ लाखांची साखर खाल्ली? कारखान्याच्या ऑडिटमध्ये खुलासा, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 02:44 PM2024-06-17T14:44:14+5:302024-06-17T14:44:58+5:30
या घोटाळ्याप्रकरणी तपास अहवाल आल्यानंतर गोदाम किपरसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलीगड : उत्तर प्रदेशातील अलीगड येथील किसान साथा साखर कारखान्यात ११०० क्विंटल साखरेचा घोटाळा झाल्याची घटना समोर आली आहे. जवळपास ३५ लाख रुपयांची साखर पावसात वाहून गेली आणि माकडांनी खाल्ल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, साथा हा साखर कारखाना २६ महिन्यांपासून बंद आहे. आता या घोटाळ्याप्रकरणी तपास अहवाल आल्यानंतर गोदाम किपरसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माकडांनी ३० दिवसांत ३५ लाख रुपयांची ११०० क्विंटल साखर खाल्ल्याचे रजिस्टरमध्ये नोंदविण्यात आले आहे. ऑडिट रिपोर्टमध्ये ही बाब समोर आली आहे. या प्रकरणात व्यवस्थापक आणि लेखा अधिकाऱ्यासह सहा जण दोषी आढळले. त्यानंतर सरकारने त्याची चौकशी केली. तपास अहवालानुसार प्रभारी गोदाम किपर आणि गोदाम किपर यांच्याविरुद्ध जवां पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑडिट टीमने गेस्ट हाऊसमध्ये बसून हवेत ऑडिटिंग केले आहे. साखरेचे साठा जेवढा कमी सांगण्यात येत आहे, तेवढा सारखरेचा साठा कमी नाही आहे. कारखान्याच्या आतील गोदामाचे शटर आणि छत तुटले आहे. छतावरून पाणी गळते. तसेच, माकडांनीही साखर खाल्ली आहे. त्यामुळे गोदामात साखर पसरली आहे, असे साखर कारखान्याच्या गोदाम किपरने सांगितले.
याचबरोबर, गोदामात पावसाचे पाणी छतावरून खाली येते, त्यामुळे ५२८ क्विंटल साखर कमी झाली आहे. ऑडिट टीमद्वारे जो ११०० क्विंटल साखर कमी झाल्याच्या रिपोर्ट आला आहे, तो चुकीचा आहे. तसेच, गोदामाच्या इमारतीची दुरवस्था आणि देखभाल भत्ता याबाबत जिल्हा प्रशासनाला अनेकवेळा पत्रे लिहिली, मात्र जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारे समस्या सुटलेली नाही, असेही गोदाम किपरने सांगितले.
दरम्यान, सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी सांगितले की, येथे माकडांची दहशत असून २०२० नंतर येथे साखरेचे उत्पादन होत नाही. साखर कारखान्याची देखभालही झालेली नाही. तसेच, गोदामातून साखर कशी कमी झाली ते माहीत नाही, पण माकडे तेवढी साखर खाऊ शकत नाहीत, असेही कर्मचाऱ्यांनी सांगितले.