राम मंदिरात भाविकांची वाढली गर्दी, पुजाऱ्यांची होणार नवी भरती; ड्रेसकोडही बदलणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 17:01 IST2024-02-08T17:00:01+5:302024-02-08T17:01:44+5:30
Ayodhya Ram Mandir: राम मंदिरातील पुजाऱ्यांना आता नवा ड्रेसकोड दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

राम मंदिरात भाविकांची वाढली गर्दी, पुजाऱ्यांची होणार नवी भरती; ड्रेसकोडही बदलणार!
Ayodhya Ram Mandir:राम मंदिरात दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढताना दिसत आहे. रामलला दर्शनासाठी आतुर झालेले भक्तगण हजारोंच्या संख्येने अयोध्येत दाखल होत आहेत. दररोज सुमारे दोन ते तीन लाख भाविक रामदर्शन घेत असल्याचे सांगितले जात आहे. एवढेच नव्हे तर देणगीतही प्रचंड वाढ झाली आहे. कोट्यवधी रुपये रामचरणी अर्पण केले जात आहेत.
देशभरातून भाविक राम मंदिरात पोहोचत असून रामललाचे दर्शन घेत आहेत. राम मंदिरात सेवेत गुंतलेले लोक रात्रंदिवस रामललासोबत दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही काळजी घेत आहेत. रामललाची पूजा मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांच्या देखरेखीखाली होत आहे. राम मंदिरासाठी नव्याने नियुक्त झालेल्या पुजाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू आहे. मंदिराच्या पुजाऱ्यांच्या ड्रेस कोडमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर आली आहे.
राम मंदिरातील पुजाऱ्यांसाठी भगव्या रंगाचा कुर्ता आणि धोतर असा ड्रेसकोड आहे. नव्याने बांधलेल्या राम मंदिरातील पुजाऱ्यांसाठी नवा ड्रेसकोड लागू केला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे. पुरोहितांसाठी तयार करण्यात येत असलेल्या ड्रेसकोडमध्ये उत्तर आणि दक्षिण भारतातील मंदिरांच्या परंपरांचा समन्वय दिसून येईल. या अंतर्गत पुजारी पिवळी चौबंदी, पांढरे धोतर आणि भगवा पटका परिधान करतील. अशा पद्धतीने नवा ड्रेसकोड लागू केला जाऊ शकतो, असा कयास आहे.
दरम्यान, राम मंदिरातील भाविकांची वाढती संख्या पाहता ट्रस्ट पुन्हा एकदा पुजाऱ्यांची भरती करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी ट्रस्ट विविध टप्प्यांवर चाचपणी करून पात्र पुजाऱ्यांची निवड करेल. राम मंदिराच्या गर्भगृहाव्यतिरिक्त संकुलात उभारल्या जाणाऱ्या उद्यानातील ७ मंदिरांमध्येही पुजाऱ्यांची गरज भासणार आहे. साहजिकच यासाठी पुरोहितांचीही गरज भासणार आहे. पुरोहितांकडे राहून पुजारी प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पूजा करण्याची जबाबदारी दिली जाईल. बहुधा हे बदल रामनवमीपूर्वी चैत्र नवरात्रीपासून लागू केले जातील, असे म्हटले जात आहे.