शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 07:30 PM2024-10-04T19:30:47+5:302024-10-04T19:31:07+5:30
Amethi Murder case: अमेठीमधील दलित शिक्षक आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची गोळ्या झाडून हत्या करणारा आरोपी चंदन वर्मा याला अखेर उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफने बेड्या ठोकल्या आहेत. या हत्याकांडानंतर चंदन वर्मा हा फरार होता.
अमेठीमधील दलित शिक्षक आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची गोळ्या झाडून हत्या करणारा आरोपी चंदन वर्मा याला अखेर उत्तर प्रदेश पोलिसांच्या एसटीएफने बेड्या ठोकल्या आहेत. या हत्याकांडानंतर चंदन वर्मा हा फरार होता. दरम्यान, आरोपीची बहीण, भाओजी यांच्यासह चार जणांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ो ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील गुढ सातत्याने वाढत असल्याने पोलीस संपूर्ण प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आरोपी चंदन वर्मा हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने दु:खी होता. चंदनची प्रेयसी असलेल्या पूनम भारती हिने १८ ऑगस्ट रोजी त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केली होती. तुरुंगातून सुटल्यानंतर चंदन याने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर रायबरेली येथील एम्स रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले होते. मृत पूनम भारती हिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी छेडछाड तसेच एसटी/एसटी कायद्यान्वये चंदनविरोधात गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, आरोपी चंदन वर्मा याने दीपक सोनी याच्या मोबाइलच्या दुकानावर त्याची दुचाकी ठेवली. त्यानंतर तो थेट सुनील कुमाप याच्या घरी गेला. तिथे त्याने चार जणांची गोळ्या झाडून हत्या केली, अशी माहिती तपासामधून समोर आली आहे. चंदन वर्मा याने या संपूर्ण हत्याकांडाचं नियोजन आधीपासूनच केलं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. तसेच पोलिसांनी आता या प्रकरणात दीपक सोनी यालाही ताब्यात घेत चौकशी केली आहे.
चंदन वर्मा याच्या बहिणीनेही त्याच्याबाबतत धक्कादायक माहिती दिली आहे. आरोपी चंदन वर्मा हा नेहमीच रागाच्या भरात राहायचा. आम्हा दोघांमध्ये फारसं बोलणं होत नसे. मागच्या काही दिवसांपासून त्याचं वर्तन खूपच बदललं होतं. मात्र तो असं काही करेल याची कुणालाच अपेक्षा नव्हती, असे तिने सांगितले.