तुफान राडा! भाजपा नेता आणि सपा आमदार एकमेकांना भिडले; पोलीस ठाण्यातच झाली हाणामारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 16:31 IST2023-05-10T16:29:28+5:302023-05-10T16:31:06+5:30
समाजवादी पक्षाचे आमदार राकेश प्रताप सिंह यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते दीपक सिंह यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

तुफान राडा! भाजपा नेता आणि सपा आमदार एकमेकांना भिडले; पोलीस ठाण्यातच झाली हाणामारी
उत्तर प्रदेशातील अमेठी येथील गौरीगंज कोतवाली येथे समाजवादी पक्षाचे आमदार राकेश प्रताप सिंह यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते दीपक सिंह यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये भाजपा नेते दीपक सिंह रागात गाडीतून खाली उतरतात आणि शिवीगाळ करतात. यावर सपा आमदार राकेश प्रताप सिंह यांचा संयम सुटला आहे.
मारहाणीनंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली असून, अनेक पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. सध्या सपाचे आमदार राकेश प्रताप सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी समजावल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. त्याचवेळी भाजपा समर्थक पोलीस ठाण्यात होते. सपा आमदारावर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे.
सपाचे आमदार राकेश प्रताप सिंह रात्री उशिरापासून अमेठीच्या गौरीगंज पोलीस स्टेशनवर धरणे धरत होते. त्यांचा आरोप होता, 'पाच दिवसांपूर्वी माझ्या एका समर्थकाच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, आजपर्यंत एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही, तीन दिवसांपूर्वी माझ्या चार समर्थकांना मारहाण करण्यात आली. माझी एफआयआर घेतली जात नाही.
दीपक सिंह यांची पत्नी रश्मी सिंह गौरीगंज नगरपालिकेतून भाजपाच्या उमेदवार आहेत. सपाचे आमदार राकेश प्रताप सिंह आजही तिथे बसले होते. दीपक सिंह आपल्या फॉर्च्युनर कारमधून आले आणि रागात खाली उतरले. यानंतर त्यांनी शिवीगाळ केली. मागे उभे असलेले सपा आमदार राकेश प्रताप सिंह यांनी ही शिवीगाळ ऐकली. त्यानंतर सपा आमदार राकेश प्रताप सिंह यांचा संयम सुटला.
सपा आमदार राकेश प्रताप सिंह यांनी दीपक सिंह यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. सपा आमदाराच्या समर्थकांनीही दीपक सिंह यांच्यावर हात उचलला. पोलीस ठाण्याच्या आत झालेल्या हाणामारीत पोलिसांनी दोन्ही बाजुच्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र बाचाबाची सुरूच होती.