.. अन् सापाने बदला घेतल्याची गावभर चर्चा, दुचाकीस्वार युवकाला डसला साप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 08:12 PM2023-08-28T20:12:20+5:302023-08-28T20:12:58+5:30
मैनपुरी येथील मेडीकलमधून औषधे घेऊन येत असताना फोन आल्याने युवक गाडी हळू चालवत पुढे जात होता.
मैनुपरी - उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिल्ह्यात सापाच्या अंगावरुन दुचाकी गेल्यानंतर त्या सापाने चालकाचा चावा घेतल्याची घटना घडली. सध्या परिसरात या घटनेची चांगलीच चर्चा होत आहे. सुदैवाने दुचाकीस्वाराला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी सकाळी ही घटना घडली असून युवक आपल्या दुचाकीवरुन औषधे आणण्यासाठी घराबाहेर पडला होता.
मैनपुरी येथील मेडीकलमधून औषधे घेऊन येत असताना फोन आल्याने युवक गाडी हळू चालवत पुढे जात होता. त्यावेळी, युवकाच्या दुचाकीचं टायर हळुवारपणे अनावधानाने सापाच्या अंगावरुन पुढे गेलं. त्यामुळे, त्या सापाने दुचाकीवर स्वार होऊन बाईकचालक युवकाला डंक मारला. साप आपल्या बाईकवर चढल्याचे प्रदीप कुमारला कळलेच नाही. काही वेळ पुढे गेल्यानंतर प्रदीप बेशुद्ध होऊन गाडीवरुन खाली पडला. याबाबत, वाटसरूंनी तात्काळ प्रदीपच्या नातेवाईकांना यासंदर्भात माहिती दिली. प्रदीप कुमार हा एलाऊ तालुक्यातील औंग गावचा रहिवाशी आहे.
प्रदीपच्या नातेवाईकांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रदीपला भरती केलं. तेथे त्याच्यावर योग्य ते उपचार करण्यात आल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, सापाने प्रदीपकडून नकळतपणे झालेल्या कृती असा बदला घेतल्याची चर्चा मैनपुरी येथील गावात होत आहे.