नवरदेवाशिवाय शेकडो वधूंनी स्वत:च्याच गळ्यात घातल्या वरमाला! उत्तर प्रदेशमध्ये मोठा घोटाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2024 06:35 AM2024-02-01T06:35:51+5:302024-02-01T06:36:09+5:30
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील बलिया येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत मोठा घोटाळा समोर आला आहे. या ठिकाणी २५ जानेवारी रोजी ५६८ जोडप्यांचे लग्न लावण्यात आले होते. मात्र यापैकी अनेक विवाह हे नवरदेवाशिवाय लावण्यात आले.
बलिया - उत्तर प्रदेशमधील बलिया येथे मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत मोठा घोटाळा समोर आला आहे. या ठिकाणी २५ जानेवारी रोजी ५६८ जोडप्यांचे लग्न लावण्यात आले होते. मात्र यापैकी अनेक विवाह हे नवरदेवाशिवाय लावण्यात आले. कहर म्हणजे शेकडो वधूंनी स्वत:च्याच गळ्यात वरमाला घातल्या. तर अनेकांचे लग्न यापूर्वी झाले असताना त्याही यात लग्नासाठी उभ्या राहिल्या. आता या प्रकरणामध्ये अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, या विवाह सोहळ्यात सहभागी झालेल्या अनेक तरुणी येथे फिरण्यासाठी आल्या होत्या. लग्नासाठी उभ्या राहा, तुम्हाला भरपूर पैसे देऊ असे आमिष दाखवून या मुलींना सोहळ्यात सहभागी करून घेण्यात आले. सोशल मीडियावर या सोहळ्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.
कुणाचे कधी झाले होते लग्न?
मंगळवारी रात्री जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक श्रीवास्तव यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सहायक विकास अधिकारी सुनील कुमार यादव आणि आठ लाभार्थी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्चना यांचे जून २०२३ मध्ये, रंजना यादव आणि सुमन चौहान यांचे मार्च २०२३ मध्ये, प्रियांकाचे लग्न नोव्हेंबर २०२३ मध्ये झाले होते, पूजाचे लग्न एक वर्षापूर्वी झाले, संजूचे तीन वर्षांपूर्वी, रमिताचे जुलै २०२३ मध्ये लग्न झाले होते.
आम्ही विवाह बघायला गेलो होतो अन्...
-आम्ही सामूहिक विवाह बघायला गेलो होतो. त्यांनी आम्हाला दोन-तीन हजार रुपयांचे आमिष दाखवून तेथे वर म्हणून बसवले.
-आम्ही स्वतः आमच्या गळ्यात हार घालून आमचा फोटो काढला, असे या घोटाळ्यातील एका तरुणाने म्हटले आहे.