रामललांच्या मूर्तीचे मंदिर परिसरात आगमन, चांदीच्या मूर्तीची मंदिर प्रदक्षिणा; शरयू नदीतीरावर पार पडला कलशपूजन सोहळा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 05:35 AM2024-01-18T05:35:03+5:302024-01-18T07:39:58+5:30
दुपारी राम मंदिराच्या गर्भगृहात श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे पदाधिकारी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली.
अयोध्या : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी रामललांची बहुप्रतीक्षित मूर्ती बुधवारी मंदिर परिसरात दाखल झाली. नियोजनानुसार मूर्तीची परिसरात प्रदक्षिणा होणार होती, मात्र तिचे वजन अधिक असल्याने त्याऐवजी १० किलो चांदीच्या मूर्तीची प्रदक्षिणा घालण्यात आली. तत्पूर्वी, सकाळी शरयू नदीतीरावर कलशपूजन झाल्यावर कलश राम मंदिरामध्ये नेण्यात आले. दुपारी राम मंदिराच्या गर्भगृहात श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे पदाधिकारी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा करण्यात आली.
आज तीर्थपूजन, जलयात्रा, जलाधिवास विधी
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी होणाऱ्या विधींच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्या गुरुवारी तीर्थ पूजन, जलयात्रा, जलाधिवास, गंधाधिवास हे विधी पार पडणार आहे. त्यानंतर शुक्रवारी औषधाधिवास, केसराधिवास, घृताधिवास आणि धान्याधिवास विधी होणार आहेत.
पंतप्रधान हेच मुख्य यजमान
रामललांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच मुख्य यजमान असतील, अशी माहिती मुख्य आचार्य लक्ष्मीकांत दीक्षित यांनी दिली.
तसेच त्यांनी ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा व त्यांची पत्नी हे मुख्य यजमान असल्याचा वृत्त फेटाळले. परंतु ते मुख्य सोहळ्यावेळी ते उपस्थित असतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.