AIMIM चा अखिलेश यादव यांना अल्टीमेटम, 5 जागा द्या नाही तर...; I.N.D.I.A. चं टेन्शन वाढणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 01:29 PM2024-02-29T13:29:24+5:302024-02-29T13:34:55+5:30
अखिलेश यादव आणि राहुल गांधी विरोधी आघाडी I.N.D.I.A. ला आकार देण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी छोट्या पक्षांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अखिलेश यादव आणि राहुल गांधी विरोधी आघाडी I.N.D.I.A. ला आकार देण्याचा प्रयत्न करत आहेत. विरोधी मतांचे विभाजन टाळण्यासाठी छोट्या पक्षांनाही सोबत घेण्याचा प्रयत्न सुरू आहेत.
काँग्रेस आणि समाजवादी पक्ष यांच्यात लोकसभेच्या 80 जागांचे वाट झाले आहे. यात काँग्रेसला 17 तर समाजवादी पक्षाला 63 जागा मिळाल्या आहेत. मात्र यातच, आता AIMIM ने समाजवादी पक्षाकडे लोकसभा निवडणुकीसाठी 5 जागांची मागणी केली आहे. एआयएमआयएमने आझमगड, मुरादाबाद, नगीना, संभल आणि आमला लोकसभा जागांवर दावेदारी केली आहे.
...तर 25 जागांवर उमेदवार उभे करू -
एआयएमआयएमचे प्रवक्ते मोहम्मद फरहान यांनी माध्यमांशी बोलताना पाच जागांवर आपली दावेदारी केली आहे. ते म्हणाले, जर सपाने पाच जागा दिल्या नाहीत, तर आम्ही 25 जागांवर आमचे उमेदवार उभे करू. यानंतर होणाऱ्या मतांच्या विभाजनाल सपा जबाबदार असेल. आघाडीत जागा मिळाल्यास दलित नेते पवन आंबेडकर नगीनामधून तर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शौकत अली आझमगडमधून निवडणूक लढवतील. तर मुरादाबाद, संभल आणि आमला जागांसाठी नंतर उमेदवारांची घोषणा केली जाईल.
विधानसभेत दिसली होती ताकद -
उत्तर प्रदेशात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत AIMIM ने आपली ताकद दाखवली होती. या निवडणुकीत त्यांना केवळ 0.49 टक्के मते मिळाली असली तरी. यामुळेच बिजनौर, नाकुर, कुर्सी, शाहगंज, सुलतानपूर, औरई, फिरोजाबाद, जौनपूर, मुरादाबाद नगर विधानसभा मतदार संघात सपा उमेदवाराचा पराभव झाल्याचे मानले जाते. महत्वाचे म्हणजे, एआयएमआयएम हळूवारपणे सपाची मुस्लीम व्होट बँक फोडण्यात यशस्वी होताना दिसत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, AIMIM ने आझमगडमधून रशीद अली यांना उमेदवारी देण्याची रणनीती आखली आहे.