केंद्रीयमंत्री साध्वी निरंजन ज्योतिंच्या अपहरणाचा प्रयत्न; आरोपीला अटक, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 12:44 PM2024-01-18T12:44:56+5:302024-01-18T12:45:47+5:30
लखनौ - केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी, मंत्री ...
लखनौ - केंद्रीयमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या अपहरणाचा अयशस्वी प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी, मंत्री निरंजन ज्योती यांचा वाहनचालक चेतरामने पोलिसात फिर्याद दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. मंत्री ज्योती ह्या दिल्लीतून लखनौकडे येत असताना ही घटना घडली. लखनौ पोलिसांनी आरोपीविरुद्ध केंद्रीयमंत्र्यांच्या अपरहाणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
मंत्री ज्योती यांच्या वाहनचालकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी मंत्री ज्योती यांना आणण्यासाठी चालक विमानतळाकडे जात होता. त्यावेळी, बंथरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील न्यू प्रधान ढाब्याजवळ चहा पिण्यासाठी गाडी थांबवण्यात आली होती. त्याचवेळी, आरोपीने त्या गाडीत घुसून गाडीतील बंदुकधारी जवानाला बाहेर काढले. त्यानंतर, ती गाडी पळवून नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी, इतर सुरक्षा जवानांनी कार अडवत कारमधील आरोपीला पकडले. त्यानंतर, पोलिसांना बोलावून आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
दरम्यान, तक्रारीनंतर आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आरोपीचा या कार पळवून नेण्यामागचा उद्देश नेमका काय होता, याची कसून चौकशी होत आहे.