रामनवमीनिमित्त अयोध्येत 50 लाखांहून अधिक भाविक येणार; प्रशासनाने सुरू केली तयारी...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2024 07:11 PM2024-04-14T19:11:38+5:302024-04-14T19:12:00+5:30
Ayodhya News: अयोध्येतील भव्य मंदिरात भगवान राम विराजमान झाल्यामुळे यंदाची रामनवमी अतिशय खास आहे.
अयोध्या: 22 जानेवारी 2024, या ऐतिहासिक दिवशी पाचशे वर्षांच्या प्रतिक्षेनंतर राम जन्मभूमी अयोध्येत भगवान श्रीरामाचे पुनरागमन झाले. केंद्रातील मोदी सरकारने अयोध्येत भव्य राम मंदिर उभारले आणि 22 जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते भगवान श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा झाली. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षी होण्यासाठी शेकडो निमंत्रित मान्यवर आणि लाखो रामभक्त आले होते.
भगवान राम अयोध्येत विराजमान झाल्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भगवान रामाच्या प्रतिष्ठापणेनंतर दररोज लाखो भाविक दर्शनासाठी अयोध्येत येत आहेत. दरम्यान, 17 एप्रिल रोजी रामनवमी आहे, यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू आहे. यंदाची रामनवमी अतिशय खास आहे, त्यामुळे 50 लाखांहून अधिक रामभक्त येण्याची शक्यता आहे. येणाऱ्या रामभक्तांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये, यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे.
रामनवमीच्या दिवशी लाखो रामभक्त अयोध्येत येणार असल्यामुळे अयोध्या महापालिका पिण्याच्या पाण्यापासून ते विविधप्रकारची सर्व सोय करुन ठेवली आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे अयोध्येतील विविध मार्गांवर तात्पुरत्या स्वरुपात पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. याशिवाय विविध ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपातील स्वच्छतागृहेही बांधण्यात आली आहेत. शहरभरात अडीच हजारांहून अधिक स्वच्छतागृहे बांधल्याची माहिती प्रशासनाने दिली.