अयोध्येतील मंदिरात रामलल्लासाठी 'हा' व्यापारी दान करणार १ किलो सोन्याचे सिंहासन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 01:09 PM2023-10-26T13:09:02+5:302023-10-26T13:11:47+5:30
२२ जानेवारीला अयोध्येतील मंदिरात रामलल्ला होणार विराजमान
Ayodhya Ram Mandir 1 Kg Gold Throne: अयोध्येच्या राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची अधिकृत तारीख अखेर सांगण्यात आली. 22 जानेवारी 2024 ला मंदिरात प्रभूश्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. राम मंदिर ट्रस्टच्या सदस्यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. राम मंदिर तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, आम्ही पंतप्रधानांची भेट घेतली. आम्ही त्यांना 22 जानेवारीला अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले आहे. पंतप्रधानांनी आमची विनंती मान्य केली आहे. त्यानुसार, मंदिरात रामलल्लाचा प्रवेश 22 जानेवारी 2024 रोजी होणार असल्याची पुष्टी झाली आहे. या मंदिरातील रामलल्लासाठी तब्बल १ किलोचे सोन्याचे सिंहासन देण्याचा संकल्प एका व्यापाराने केला आहे.
कोण देणार सुवर्ण सिंहासन?
आंध्र प्रदेशातील भक्त सी. श्रीनिवासन यांनी प्रभूश्रीरामासाठी एक किलो सोन्याचे सिंहासन दान करणार असल्याचे म्हटले आहे. सिंहासनासोबतच श्रीनिवासन 8 किलो चांदीच्या चरण पादुकाही अर्पण करणार आहेत. ते कांची शंकराचार्य स्वामी जयेंद्र सरस्वती यांचे शिष्य आहेत. या चरण पादुकांसह श्रीनिवासन यांनी 40 दिवस अयोध्येत विविध ठिकाणी पूजा केली आहे.
पादुकांच्या बाबतीत खास गोष्ट काय?
श्रीनिवासन भगवान रामलल्लाला जी चरण पादुका अर्पण करणार आहेत, त्यात 10 बोटांच्या जागी रत्ने आहेत. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, याशिवाय पादुकांवर भगवान श्रीरामाशी संबंधित गदा, कमळ, स्वस्तिक, सूर्य आणि चंद्र अशी चिन्हे आहेत. श्रीनिवासन यांनी 40 दिवस अयोध्येतील नंदीग्राम, भारत कुंड आणि सूर्य कुंड यांसारख्या ठिकाणी या चरण पादुकांना भेट दिली आणि त्यांची पूजा केली. अयोध्येच्या 84 कोसी परिक्रमेच्या मार्गावर येणाऱ्या सर्व धार्मिक स्थळांवर चरण पादुका पूजन करण्यात आले आहे.