हायटेक शस्त्रे, स्पेशल पॉवर; श्रीराम मंदिराच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात, अशी असेल सुरक्षा...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 03:17 PM2023-09-19T15:17:03+5:302023-09-19T15:17:49+5:30
Ayodhya Ram Mandir: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या विशेष दलाकडे राम मंदिर परिसराती सुरक्षा देण्यात आली आहे.
Ayodhya Ram Mandir: श्रीरामजन्मभूमी अयोध्येतील प्रभू रामाचे भव्य-दिव्य मंदिर वेगाने आकार घेत आहे. लवकरच या मंदिराचे उद्घाटन होणार आहे, त्यामुळे मंदिराची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात येत आहे. रामजन्मभूमी परिसराच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. रामजन्मभूमी सुरक्षा समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
रामजन्मभूमीच्या 108 एकर जागेची सुरक्षा विशेष सुरक्षा दलाच्या (UPSSF) हाती असेल. कॅम्पसच्या या 108 एकर क्षेत्राला रेड झोन म्हणतात. हा अतिशय संवेदनशील परिसर आहे. आतापर्यंत येथील सुरक्षा व्यवस्था सीआरपीएफच्या हाती होती. त्यात आता विशेष सुरक्षा दलाचे कमांडो सामील झाले आहेत.
मंदिर आणि येथे येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी CRPF च्या एकूण 6 बटालियन तैनात आहेत, ज्यामध्ये CRPF ची एक महिला बटालियनदेखील असेल. त्यांच्यासोबतच पीएससीचे जवानही तैनात करण्यात आले आहेत. इतकंच नाही तर रामजन्मभूमी संकुलाच्या आत आणि बाहेर सुरक्षेसाठी यूपी पोलिसांची एक टीम तयार असेल.
प्रशिक्षण दिले जाणार
यूपीएससीच्या दोन बटालियनचे 280 जवान अयोध्येत पोहोचले असून त्यांना सात दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. यानंतर त्यांना रेड झोनच्या सुरक्षेसाठी तैनात केले जाईल. मंदिर परिसरात प्रत्येक ठिकाणी सैनिक पाहणी करत आहेत. सैनिकांना संकुलाच्या रुट मॅपची माहिती दिली जात आहे. त्यांना अयोध्येची भौगोलिक स्थितीही सांगितली जात आहे. याशिवाय जन्मभूमी संकुलात भाविकांशी कसे वागावे, याचे प्रशिक्षणही विशेष दलांना दिले जात आहे.
UPSSF ला विशेष पॉवर
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेली यूपीएसएसएफ राज्यातील संवेदनशील इमारती, धार्मिक स्थळे, औद्योगिक युनिट्स आणि मेट्रो स्टेशनवर तैनात केले जाईल. UPSSF ला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. UPSSF वॉरंटशिवाय कोणालाही अटक आणि तपासणी करु शकतात.