२५०० वर्षांची ‘गॅरंटी’! भूकंप येवो अथवा त्सुनामी, राम मंदिराची एक वीट हलणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 11:39 AM2024-01-18T11:39:51+5:302024-01-18T11:40:13+5:30
Ayodhya Ram Mandir: अनेकविध वैशिष्ट्ये असलेले राम मंदिर सर्वाधिक सुरक्षित होण्यासाठी अनेक प्रकारच्या यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.
Ayodhya Ram Mandir: २२ तारखेला राम मंदिरात रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. यापूर्वी अनेकविध धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. विशेष अनुष्ठान, पूजा-पाठ सुरू आहेत. राम मंदिरावरून राजकारणही तापताना दिसत आहे. यातच एखादा मोठा भुकंप आला किंवा त्सुनामी आली तरीही राम मंदिराला कोणताही धोका पोहोचणार नाही, अशाच प्रकारे या मंदिराची रचना आणि बांधकाम केले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
अहमदाबाद-बीआरडीचे आर्किटेक्ट चंद्रकांत यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १,२०० कोटी रुपयांच्या राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे. हिमालय क्षेत्रात येणाऱ्या पूर आणि भूकंपाचा अभ्यास करून भुकंप प्रतिरोधक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. हे राम मंदिर २५०० वर्षे सुरक्षित राहील, असा दावा करण्यात आला आहे. सोमपुरा आणि त्यांचा मुलगा आशिष यांनी मंदिर परिसराची संरचना केली.
राम मंदिर सर्वधर्मियांसाठी खुले असावे
चंद्रकांत यांनी सांगितले की, प्रकृतीच्या कारणास्तव प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाण्यास जमणार नाही. परंतु मंदिर पूर्ण झाल्यावर ते सर्व धर्माच्या लोकांसाठी खुले व्हावे, अशी इच्छा चंद्रकांत यांनी व्यक्त केली. चंद्रकांत यांनी देश-विदेशातील २०० हून अधिक मंदिरांची संरचना केली आहे. हे जगातील पहिले मंदिर असेल ज्यासाठी रिश्टर स्केलवर ८ पर्यंतच्या भूकंप प्रतिरोधासाठी बांधकाम करण्यापूर्वी 3D संरचनात्मक विश्लेषण केले गेले आहे. रुरकी येथील सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूटने राम मंदिराला कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी सखोल आणि सविस्तर पाहणी, विश्लेषण केले. हे राम मंदिर आतापर्यंत नोंदवल्या गेलेल्या सर्वोच्च पूर पातळीपेक्षा २० फूट अधिक उंचावर आहे, अशी माहिती आशिष यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.
दरम्यान, राम मंदिराचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे रामनवमीच्या दिवशी सूर्याची किरणे मूर्तीवर पडतील, यासाठी शिखरावर लेन्स लावल्या जाणार आहेत, असेही आशिष यांनी सांगितले. राम मंदिरापासून ७०० मीटर अंतरावर असलेल्या एका हॉलमध्ये २१ तरुण राम मंदिराचे पुजारी बनण्यासाठी मेहनत घेत आहेत. या सर्वांचे वय ३० वर्षांपेक्षा कमी आहे.