रामदर्शन घेणे होणार आणखी सुलभ; अयोध्येत साकारतोय सुग्रीव पथ, योगी सरकारचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 04:26 PM2024-02-24T16:26:22+5:302024-02-24T16:26:53+5:30
Ayodhya Ram Mandir: अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, राम मंदिरापर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे, यासाठी योगी सरकार नवीन पथनिर्मिती करणार आहे.
Ayodhya Ram Mandir: बालरुपातील रामलला दर्शन घेण्यासाठी अयोध्येत लाखोंच्या संख्येने भाविक येत आहेत. दररोज लाखो भक्त रामदर्शन घेत आहेत. तर दानधर्मही मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. गेल्या महिन्याभरात सुमारे ६२ लाख भाविकांनी अयोध्येत येऊन रामदर्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. यातच आता भाविकांना रामलला दर्शन अधिक सुलभतेने घेता यावे, यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने पुढाकार घेतला आहे. अयोध्येत आता सुग्रीव पथ तयार केला जात आहे.
रामललाचे दर्शनासाठी दररोज लाखो भाविक अयोध्येत येत आहेत. ही गर्दी लक्षात घेऊन योगी सरकारने रामलला मंदिरापर्यंत नवीन रस्ता बांधून वाहतूक मार्ग सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नवीन कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे. सुग्रीव पथ नावाने बांधण्यात येणाऱ्या या कॉरिडॉरची लांबी २९० मीटर असेल. हनुमानगढी आणि राम मंदिर परिसरादरम्यान आयताकृती सर्किट म्हणून सुग्रीव पथ तयार केला जाणार आहे. राम मंदिरापर्यंत जाणे भाविकांना अधिक सुलभ होणार आहे.
भाविकांना राम मंदिरापर्यंत पोहोचण्यास समस्या
प्राणप्रतिष्ठेपासून दररोज सुमारे दोन ते अडीच लाख भाविक रामलला दर्शनासाठी येत असल्याचा श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचा अंदाज आहे. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. भाविकांना राम मंदिरापर्यंत पोहोचून श्रीरामांचे दर्शन घेण्यात समस्या येत आहेत. हे पाहता योगी आदित्यनाथ सरकारने अयोध्येत सुग्रीव पथ नावाच्या नवीन कॉरिडॉरच्या उभारणीचे काम सुरू केले आहे. या कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर भाविकांचा अयोध्येतील प्रवास सुलभ होऊ शकेल, असे म्हटले जात आहे.
दरम्यान, अयोध्येतील हनुमानगढी मंदिर ते राम मंदिरापर्यंत बांधण्यात येणाऱ्या सुग्रीव पथासाठी अंदाजे ११.८१ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी ५.१ कोटी भूसंपादनासाठी वापरण्यात येणार आहेत. कॉरिडॉरची रुंदी अंदाजे १७ मीटर असेल. सुग्रीव पथाच्या बांधकामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आली आहे. सुग्रीव पथाच्या बांधकामासाठी आधी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे.