अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळा भव्य होणार, ८० देशांच्या प्रमुखांना आमंत्रित केलं जाणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 02:34 PM2023-10-10T14:34:22+5:302023-10-10T14:34:52+5:30
देशातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होणार आहे.
अयोध्या : अयोध्येमध्ये राम मंदिराचे बांधकाम वेगाने सुरू आहे. हे मंदिर जानेवारी महिन्यात भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. दरम्यान, प्राणप्रतिष्ठेची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. रामजन्मभूमीवरील राम मंदिराचा आकार दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचवेळी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट रामलल्ला प्राणप्रतिष्ठा महोत्सवाला जागतिक स्वरूप देण्यात गुंतले आहे. देशातील सर्वात मोठा धार्मिक कार्यक्रम २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होणार आहे.
मंदिर ट्रस्टने प्राणप्रतिष्ठेदरम्यान देशातूनच नव्हे तर विदेशातील पाहुण्यांची यादी तयार केली आहे. ट्रस्टने तयार केलेल्या यादीत भारतासह जगातील ८० देशांच्या राष्ट्रप्रमुखांची नावेही समाविष्ट करण्यात आली आहेत. जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या मुख्य कार्यक्रमाच्या तारखेला विदेशातील पाहुण्यांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ट्रस्टशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले की, आमचे संघटन जगातील ४० देशांमध्ये सक्रियपणे काम करत आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी जगातील ८० देशांच्या प्रमुखांना आमंत्रित करण्याची तयारी सुरू आहे. जगातील २५ देश असे आहेत, ज्यांचे प्रतिनिधी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या आयोजनात उपस्थिती होतील, असे संकेत आहेत. कुंभमेळ्याच्या धर्तीवर अयोध्येतही ५ स्टार सुविधा असलेले तंबू तयार केले जात आहेत. हे तंबू पहिल्या कुंभाच्या वेळीच बनवण्यात आले आहेत.
दरम्यान, अयोध्येतील राम मंदिरातील प्राण प्रतिष्ठेदरम्यान संपूर्ण भारतातील प्रसिद्ध साधु-संतासोबतच जगभरातील मान्यवरांचाही समावेश आहे. त्यांना २२ जानेवारी २०२४ रोजी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी आमंत्रित केले जाईल. या विशेष पाहुण्यांच्या यादीत डॉक्टर, चित्रपट अभिनेते, खगोलशास्त्रज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध धर्मातील प्रमुख व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे.