अयोध्या राम मंदिरात ४ दिवस व्हीआयपी दर्शन बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 11:26 AM2024-04-15T11:26:39+5:302024-04-15T11:28:06+5:30
रामनवमीनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी, सर्व ऑनलाइन पास केले रद्द
अयोध्या: रामनवमी संदर्भात श्रीराम मंदिर ट्रस्टने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून १५ ते १८ एप्रिलपर्यंत व्हीआयपी दर्शनावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय रामनवमीला भाविकांना इतर अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे. ज्या भाविकांनी १५ ते १८ एप्रिल दरम्यान ऑनलाइन पाससाठी अर्ज केले होते, ते सर्व पासही रद्द करण्यात आले आहेत. राम मंदिर ट्रस्टच्या सरचिटणीसांनी रामलल्लांच्या जयंतीनिमित्त लोकांना मोबाइल फोन सोबत आणू नका, असे आवाहन केले आहे.
यंदा अयोध्येतील विशाल राम मंदिरात रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. त्यामुळे अयोध्येत रामनवमीची तयारी जोरात सुरू आहे. रामनवमीच्या दिवशी रामलल्लांचे दर्शन घेण्यासाठी ५० लाखांहून अधिक भाविक अयोध्येत पोहोचतील, असा अंदाज आहे. आता राम भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिकेनेही तयारी जोरात सुरू केली आहे.
१,११,१११ किलो लाडूंचा प्रसाद अयोध्येला पाठवणार
रामनवमीच्या निमित्ताने अयोध्येतील रामलल्ला मंदिरात १७ एप्रिल रोजी प्रसाद म्हणून १,११,१११ किलो लाडू प्रसाद म्हणून पाठवले जातील, असे उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथील देवराह हंस बाबा ट्रस्टचे विश्वस्त अतुल कुमार सक्सेना यांनी सांगितले. देवराह हंस बाबा आश्रमातर्फे काशी विश्वनाथ मंदिर असो किंवा तिरुपती बालाजी मंदिर असो, मंदिरांना प्रसादाची पाच हजार पाकिटे पाठवली जातात. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देवराह हंस बाबा आश्रमाने ४४,४४० किलोंचे लाडू प्रसादासाठी पाठवले होते, असेही त्यांनी सांगितले.
महापालिकेची पादुका सेवा
अयोध्येत येणाऱ्या लाखो भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत रामपथ, धर्मपथ तसेच जन्मभूमी मार्गावर पिण्याच्या पाण्याची तात्पुरती सोय सुरू करण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेतर्फे अयोध्येत ८ ठिकाणी पादुका सेवा सुरू करण्यात आली आहे.