२०४७ पर्यंत अयोध्या होणार जागतिक आध्यात्मिक राजधानी; ३५ हजार कोटी खर्चून होतोय मेकओव्हर
By यदू जोशी | Published: December 30, 2023 05:13 AM2023-12-30T05:13:58+5:302023-12-30T05:14:23+5:30
प्रचंड प्रमाणात विकासकामे सुरू
यदु जोशी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या : अयोध्यानगरी आणि आसपासच्या परिसरात सध्या प्रचंड पायाभूत सुविधांची उभारणी केली जात असून, जगभरातील पर्यटक यापुढे लाखोंच्या संख्येने नित्यनेमाने येत राहणार हे लक्षात घेऊन ३५ हजार कोटी रुपये खर्चाचा मेकओव्हर प्लॅन तयार करण्यात आला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी योगी सरकारने सुरू केली आहे. या शिवाय, सन २०४७ पर्यंत अयोध्येला जागतिक आध्यात्मिक राजधानी बनविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
भव्यदिव्य राम मंदिराचे कोट्यवधी हिंदूंचे स्वप्न साकारत असतानाच दुसरीकडे त्या निमित्ताने उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त बळकटी देईल, असा विकासाचा ‘अयोध्या ब्रॅण्ड’ही आकार घेत असल्याचे दिसत आहे. आयएएस अधिकारी असलेले प्राधिकरणाचे उपाध्यक्ष विशाल सिंग यांच्या कार्यालयाने याबाबतची माहिती दिली.
श्री राम यांचे शेवटचे स्नान गुप्तार घाटावर
गुप्तार घाट ही एक अनोखी जागा आहे. शरयू नदीच्या तिरावरील या घाटावर प्रभू श्री राम यांनी वैकुंठ गमनापूर्वीची शेवटचे स्नान केले होते. त्यामुळे हा घाट अतिशय पवित्र मानला जातो. तेथे मोठ्या प्रमाणात सुविधा निर्माण केल्या जात आहेत. राम पथ, भक्ती पथ आणि राम जन्मभूमी मार्गासह ३० किलोमीटर लांबीच्या दर्शनी भागात सुधारणा करण्यात येत आहेत. सर्व घरे, दुकानांचा सारखाच रंग, त्यावर राम मंदिराची कमान, प्रभू रामाची विविध रुपे असलेली चित्रे साकारण्यात येत आहे.
नेमकी कशी बदलतेय अयोध्यानगरी?
अयोध्या नगरीत २५ ठिकाणी ९ मीटर उंचीचे श्री राम स्तंभ उभारण्यात येणार आहेत. ‘राम की पैडी’ म्हणजे शरयू नदीवरील घाटांची मालिका. प्रभू श्री राम शरयू नदीवर स्नानासाठी या मार्गानेच जात असे मानले जाते. या ठिकाणी लता मंगेशकर स्मृती चौक उभारला आहे. लतादीदींनी गायलेली प्रभू रामाची महती सांगणारी भजने येथे ऐकायला मिळतात. शरयू नदीच्या मध्यात पंचवटी द्विपाची उभारणी केली जात आहे. तिथे विविध प्रकारच्या धार्मिक, मनोरंजनात्मक, सांस्कृतिक कार्यक्रम होतील. शरयूच्या तिरावर पॅराग्लायडिंग, जेट-स्की, हॉट एअर बलून असे साहसी खेळ असतील. ३२ हेक्टर परिसरात ग्रीन फिल्ड वेदिक सिटीची उभारणी केली जाणार आहे. देशविदेशातील उच्चभ्रू लोकांसाठी वेगळा झोन असेल. चौधरी चरणसिंग घाटालगत त्यासाठी अयोध्या हाट उभारले जात आहे. तिथे निसर्गरम्य वातावरणातील महागडी निवासस्थाने, अलिशान हॉटेल्स आणि करमणुकीसाठीची साधने असतील.
अयोध्येची नकोशी ओळख अशी पुसली जाणार...
धर्माला अध्यात्माची जोड देत अयोध्या जागतिक केंद्र व्हावे आणि भारतीय जीवनशैली, तत्त्वज्ञान व धार्मिकतेचा संगम साधत त्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठीच्या आवश्यक सोयीसुविधांची उभारणी अयोध्येत केली जात आहे. दर्शननगर भागातील सूर्यकुंड हे सूर्यवंशी शासकांनी सूर्याची आराधना करण्यासाठी बांधले होते. सूर्यकुंडाचा परिसर आता सुसज्ज करण्यात येत आहे. साउंड ॲण्ड लाइट शोद्वारे सूर्यकुंडाचा इतिहास विदित केला जाईल. आजूबाजूला भरपूर पार्किंग व्यवस्था, फूडकोर्ट, ओपन जिम, स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येत आहे. अशा नागरी सुविधा संपूर्ण शहर व परिसरातही उभारल्या जात आहेत. रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपुलांची उभारणी जागोजागी होत आहे. त्यामुळे अरुंद गल्लीबोळांचे आणि अत्यंत गैरसोयींचे शहर ही अयोध्येची नकोशी ओळख पुसली जाणार आहे.