अयोध्येला ३५ हजार जवानांचा वेढा पडणार; सोहळ्यासाठी कडेकोट सुरक्षा, बोटीद्वारे गस्त घालणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 08:36 AM2024-01-09T08:36:40+5:302024-01-09T08:37:57+5:30
UPSSF ची टीम तैनात करण्यात आली आहे
त्रियुग नारायण तिवारी, लोकमत न्यूज नेटवर्क, अयोध्या : पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत अयोध्येत होणाऱ्या श्रीरामजन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, मुख्य कार्यक्रमाच्या दिवशी ३५ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
संपूर्ण राम मंदिर परिसरात आधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ९० कोटी रुपये खर्चून उच्च सुरक्षा यंत्रणा बसवण्यात येत आहेत. १० जानेवारीला या यंत्रणांची चाचणी होणार आहे. लखनौ विभागाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक पीयूष मोदी या अयोध्येत तळ ठोकून आहेत. त्यांच्या निर्देशानुसार सुरक्षा व्यवस्थेची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यात आली आहे.
राम मंदिराच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात करण्यात आले असून, ते येथे पोहोचले आहेत. आयबी, एलआययू, एटीएस, एसटीएफ या यंत्रणांनी आपले काम सुरू केले आहे. एटीएसचे १५० जवानही शहरात पोहोचले आहेत. नवीन घाटावर पोलिसांचा नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे.
शरयू नदीत बोटीद्वारे गस्त घालण्यात येणार असून, नदीच्या दोन्ही बाजूला सुरक्षा पथके तैनात करण्यात येणार आहेत. यूपीएसएसएफची टीम तैनात करण्यात आली आहे.