सपा नेते आझम खान यांना ७ वर्षांची शिक्षा, बनावट प्रमाणपत्र प्रकरणी कुटुंबासह जाणार तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 04:09 PM2023-10-18T16:09:06+5:302023-10-18T16:10:28+5:30

आजच तिघांनाही न्यायालयातून थेट कारागृहात पाठवण्यात येणार आहे. 

azam khan wife tazeen fatama son abdullah found guilty in birth certificate case | सपा नेते आझम खान यांना ७ वर्षांची शिक्षा, बनावट प्रमाणपत्र प्रकरणी कुटुंबासह जाणार तुरुंगात

सपा नेते आझम खान यांना ७ वर्षांची शिक्षा, बनावट प्रमाणपत्र प्रकरणी कुटुंबासह जाणार तुरुंगात

समाजवादी पार्टीचे नेते आझम खान यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मुलगा अब्दुल्ला आझम यांच्या दोन जन्म प्रमाणपत्रांच्या प्रकरणात न्यायालयाने संपूर्ण कुटुंबाला दोषी ठरवले आहे. अब्दुल्ला आझम यांच्यासह आझम खान आणि त्यांची पत्नी तंझीन फातिमा या तिघांनाही प्रत्येकी सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, आजच तिघांनाही न्यायालयातून थेट कारागृहात पाठवण्यात येणार आहे. 

रामपूरच्या खासदार-आमदार न्यायालयाने हा आदेश दिला आहे. याप्रकरणी भाजप नेते आकाश सक्सेना यांनी गुन्हा दाखल केला होता. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत आझम खान यांचे पुत्र  अब्दुल्ला आझम यांनी रामपूरच्या स्वार विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीतही त्यांनी बाजी मारली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आणि बसपा नेते नवाब काझिम अली खान यांनी अब्दुल्ला आझम यांच्या वयाबाबत उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अब्दुल्ला आझम यांचे वय विधानसभेची निवडणूक लढवण्याचे नाही, असा आरोप नवाब काझिम यांनी केला होता.

शैक्षणिक प्रमाणपत्रांमध्ये अब्दुल्ला आझम यांची जन्मतारीख १ जानेवारी १९९३ आहे, तर त्यांच्या जन्म प्रमाणपत्रात ३० सप्टेंबर १९९० दाखवण्यात आली आहे. या खटल्याची सुनावणी करताना उच्च न्यायालयाने अब्दुल्ला आझम यांनी सादर केलेले जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले आणि स्वार मतदारसंघातून त्यांची निवडणूक रद्द केली. अब्दुल्ला आझम यांनी २०१७ मध्ये निवडणूक लढवली, तेव्हा त्यांचे वय २५ वर्षांपेक्षा कमी असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. अब्दुल्ला आझम यांनी २०१७ मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवली, तेव्हा त्यांचे वय २५ वर्षांपेक्षा कमी होते. पण तरीही त्यांनी बनावट प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली. 

अब्दुल्ला आझम यांनी रामपूरच्या स्वार विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली, तेव्हा शफीक अन्सारी त्यांचे प्रस्तावक होते. आता शफिक अन्सारी अपना दलात असून ते अपना दलाचे आमदार झाले आहेत. मात्र, २०१७ मध्ये फक्त अब्दुल्ला आझम स्वार मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. त्यानंतर या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला. रामपूरचे भाजप आमदार आकाश सक्सेना यांनी अब्दुल्ला आझम याच्याविरुद्ध रामपूरच्या गंज पोलिस ठाण्यात २०१९ मध्ये दोन जन्म प्रमाणपत्रे असल्याचा गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये आझम खान आणि त्यांची पत्नी तंझीन फातिमा यांनाही आरोपी करण्यात आले होते. आता न्यायालयाने आझम खान, अब्दुल्ला आझम आणि तंझीन फातिमा यांना दोषी ठरवले असून तिघांनाही सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

Web Title: azam khan wife tazeen fatama son abdullah found guilty in birth certificate case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.