यूपीमध्ये दिसणार 'बिहार पॅटर्न'! मायावतींच्या खेळीने अखिलेश यादव यांची वाढली धाकधूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 12:41 PM2024-03-13T12:41:18+5:302024-03-13T12:41:51+5:30
लोकसभेच्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष विविध डावपेच खेळताना दिसत आहेत
Mayawati vs Akhilesh Yadav, UP Lok Sabha: लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा कधीही होईल. त्याआधी सर्वच पक्ष तयारी करत असून वेगवेगळे डावपेच आखताना दिसत आहेत. तशातच बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत जे चिराग पासवान यांनी केले, तसेच काहीसे आता मायावती उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांच्यासोबत करणार असल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीच्या काही उमेदवारांची नावे पाहिल्यानंतर हेच जाणवते. बसपा लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवत असून पश्चिम उत्तर प्रदेशातील काही जागांवरून पुढे आलेली नावे सपा पक्षाला डोकेदुखी ठरणार आहेत. बसपने सहारनपूर, अमरोहा आणि मुरादाबादमधून मुस्लिम उमेदवारांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे. १५ मार्चनंतर औपचारिक घोषणा केली जाईल, परंतु पक्षाने आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले आहे की मुरादाबादमधील इरफान सैफी, अमरोहा येथील मुजाहिद हुसेन आणि सहारनपूरचे माजीद अली हत्तीवर स्वार होतील.
अखिलेश यादव यूपीमध्ये काँग्रेसपेक्षा जास्त जागांवर लढत आहेत. त्यांनी PDA फॉर्म्युला खूप वाढवला आहे, ज्यामध्ये A म्हणजे अल्पसंख्याक. तिन्ही जागांवर मुस्लिम आणि दलितांची लक्षणीय लोकसंख्या आहे. याच कारणामुळे गेल्या वेळी सपा-बसपा युतीचा फायदा झाला होता. यावेळी सपा आणि काँग्रेस एकत्र आले आहेत आणि त्यांना आशा आहे की मुस्लिम आपल्याला मतदान करतील परंतु बसपने याच जागांवर तुल्यबळ मुस्लिम उमेदवार उभे करत त्यांचा डाव उधळण्याचा प्लॅन केल्याचे दिसत आहे. आता बसपने त्यांची मते खाल्ली तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपलाच होईल.
सैफी हे ओबीसी मुस्लिम असून मुरादाबादमधील ठाकूरद्वाराचे नगराध्यक्ष आहेत. आरोहामध्ये बसपने मुजाहिद हुसेन यांना उमेदवारी ठरवली आहे. ते उच्चवर्णीय मुस्लिम समाजातील आहे. ते व्यापारी असून त्यांची पत्नी गाझियाबाद जिल्ह्यातील डासना नगर पंचायतीच्या अध्यक्षा आहेत. तर सहारनपूर येथून माजिद अली यांना बसपा उमेदवारी देऊ शकते. ते ओबीसी मुस्लिम आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. गेल्या निवडणुकीत बसपचे हाजी फजलुर रहमान विजयी झाले होते. त्यामुळे काही महत्त्वाच्या जागांवर अखिलेश यांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे.