काँग्रेस सोडून आलेल्या कृपाशंकर सिंह यांना लोकसभेचं तिकीट, भाजपचा २५ वर्षांचा दुष्काळ संपेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 08:57 PM2024-03-02T20:57:40+5:302024-03-02T21:02:19+5:30
कृपाशंकर सिंह २०२१मध्ये भाजपमध्ये आल्यानंतर त्यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत
Kripashankar Singh BJP Candidate Lok Sabha Elections 2024: उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. उत्तर प्रदेशात भाजपने ५१ जागांवर उमेदवार घोषित केले. यातील अनेक जागांवर उमेदवारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पण यात एक नवीन नावाचा सहभाग झाला आहे. ते म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले कृपाशंकर सिंह. महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री असलेले कृपाशंकर सिंह यांना जौनपूरमधून तिकीट देण्यात आले आहे. कृपाशंकर सिंह यांनी २०२१ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. यापूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. ते मूळचे जौनपूरचे असून राजपूत समाजाचे आहेत. राजकीय गणितांचा अंदाज घेऊनच कृपाशंकर सिंह यांनी जौनपूरमधून लोकसभेचे तिकीट दिल्याचे सांगितले जात आहे.
कृपाशंकर सिंह यांनी भाजपने दिलेल्या संधीसाठी पक्षश्रेष्ठींचे आभार व्यक्त केले. 'इतकी वर्ष काँग्रेससाठी काम करुन संधी मिळाली नाही, पण भाजपा पक्षश्रेष्ठींनी लोकसभा निवडणुकीची संधी दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार,' असे ते म्हणाले.
भाजपमध्ये २०२१ पासून पार पाडल्या विविध जबाबदाऱ्या
कृपाशंकर सिंह यांनी २०१९ मध्ये काँग्रेस सोडली. जम्मू-काश्मीरबाबत काँग्रेसने NDAच्या धोरणाला विरोध केल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडली होती. 2004 मध्ये राज्यात काँग्रेसचे सरकार असताना त्यांना महाराष्ट्रात मंत्री करण्यात आले होते. ते मुंबईतील सांताक्रूझ भागातून आमदार होते. 2008 ते 2012 दरम्यान ते मुंबई काँग्रेसचे प्रमुख होते. काँग्रेस सोडल्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. २०२२च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने त्यांना मोठी जबाबदारी दिली होती. भाजपने त्यांना गुजरातमधील १० जिल्ह्यांचे प्रभारी बनवले होते. याशिवाय भाजपने महाराष्ट्रात पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदीही त्यांची नियुक्ती केली होती.
२५ वर्षांचा दुष्काळ संपणार?
१९९९ पासून जौनपूरमध्ये भाजपला निवडणूक जिंकता आलेली नाही. सध्या बसपचे श्याम सिंह यादव जौनपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या कृष्ण प्रताप सिंह यांचा पराभव केला. श्याम सिंह यादव यांना ४,४०,१९२ मते मिळाली होती. 1999 मध्ये या जागेवरून भाजपने शेवटची निवडणूक जिंकली होती तेव्हा स्वामी चिन्मयानंद विजयी होऊन लोकसभेत पोहोचले होते. त्यानंतर समाजवादी पक्षाने एक निवडणूक जिंकली. त्यानंतर सलग तीन निवडणुकांमध्ये ही जागा मायावतींच्या पक्ष बसपाने जिंकली.