योगींच्या युपीत भाजपचे मिशन ८०! लोकसभेसाठी जय्यत तयारी; ‘ट्रिपल इंजिन’ने मिळणार गती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 06:52 PM2023-07-19T18:52:04+5:302023-07-19T18:55:19+5:30

BJP Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: मिशन ८० साध्य करण्यासाठी भाजपने एका प्रशिक्षण कार्यक्रमाची ब्ल्यू प्रिंट तयार केली असून, दिग्गज नेते यात सहभागी होणार आहेत.

bjp triple engine govt to train panchayat representatives for uttar pradesh mission 80 for lok sabha election 2023 | योगींच्या युपीत भाजपचे मिशन ८०! लोकसभेसाठी जय्यत तयारी; ‘ट्रिपल इंजिन’ने मिळणार गती

योगींच्या युपीत भाजपचे मिशन ८०! लोकसभेसाठी जय्यत तयारी; ‘ट्रिपल इंजिन’ने मिळणार गती

googlenewsNext

BJP Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. मित्रपक्षांची एक मोठी आणि महत्त्वाची बैठक दिल्लीत पार पडली. उत्तर प्रदेशात भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी ८० जागांचे लक्ष्य ठेवले आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपसाठी उत्तर प्रदेश हे राज्य अतिशय महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपने मोठी तयारी सुरू केल्याचे सांगितले जात आहे. 

'मिशन ८०'चा नारा देत भाजपने सर्वाधिक जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये लोकसभा निवडणुकांची तयारी तीव्र केली आहे. महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वांत मोठी मोहीम राबवल्यानंतर आता भाजपने नवा आराखडा तयार केला आहे. याअंतर्गत 'ट्रिपल इंजिन'ला गती देऊन भाजप मिशन ८० चे लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न करणार आहे. 

ज्येष्ठ नेते लोकसभा निवडणुकीत विजयासाठी काम करण्याचा मंत्र देणार

महासंपर्क अभियानानंतर भाजपने आपल्या खासदार-आमदारांसाठी निश्चित केलेल्या लक्ष्याची मुदत पुन्हा वाढवली आहे, यावरून उत्तर प्रदेशमधील ८० जागा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, याचा अंदाज लावता येतो. भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी भूमिका स्पष्ट करून पंचायत प्रतिनिधींना जबाबदारी दिली जाईल, असा आराखडा तयार केला आहे. यासाठी भाजप ऑगस्ट महिन्यात प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांना लोकसभा निवडणुकीत विजयासाठी काम करण्याचा मंत्र देणार आहेत. 

प्रशिक्षण कार्यक्रमाची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रिजेश पाठक, प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी आणि संघटनेचे सरचिटणीस धर्मपाल सिंह प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. ते पंचायत प्रतिनिधींना मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच संघटनेची धोरणे, ग्राम विकास, पंचायत आणि योजनांच्या अंमलबजावणीत तज्ज्ञ मानले जाणारे पक्षाचे नेतेही प्रशिक्षण देणार आहेत. भाजपने पूर्वतयारी बैठक घेऊन या कार्यक्रमाची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट तयार केली आहे.

प्रशिक्षण देऊन लोकांमध्ये पाठवले जाईल 

या प्रशिक्षण कार्यक्रमाबाबत उत्तर प्रदेश भाजपचे सरचिटणीस राम प्रताप सिंह म्हणाले की, भाजप नेहमीच लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करते. यासाठी पंचायत प्रतिनिधींना प्रशिक्षण दिले जाणार आहे. लोकसभेच्या यूपीमधील सर्व जागा जिंकण्याच्या मिशनवर पक्ष काम करत आहे. पंचायत अध्यक्ष व सदस्यही लोकप्रतिनिधी आहेत. अशा परिस्थितीत त्यांना प्रशिक्षण देऊन लोकांमध्ये पाठवले जाईल.

दरम्यान, उत्तर प्रदेशच्या जिल्हा पंचायत अध्यक्षांसह संपूर्ण देशातील संस्था प्रतिनिधींचे प्रशिक्षण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हरियाणामध्ये होणार आहे. तर पंचायत सदस्यांसाठी हे प्रशिक्षण उत्तर प्रदेशमध्ये प्रदेशनिहाय असेल. उत्तर प्रदेशातील पंचायत प्रतिनिधी सहभागी होतील. यासाठी अवध, कानपूर-बुंदेलखंड, काशी, गोरक्ष, ब्रज आणि पश्चिम विभागातील पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षणाची तारीख आणि ठिकाण निश्चित करण्यास सांगितले आहे.

 

Web Title: bjp triple engine govt to train panchayat representatives for uttar pradesh mission 80 for lok sabha election 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.