गोंधळात गोंधळ! BJP उमेदवार समजून कार्यकर्त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचे केले स्वागत, पाहा video
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 05:49 PM2024-03-27T17:49:58+5:302024-03-27T17:50:56+5:30
Lok Sabha Election: भाजपचे लोकसभा उमेदवार स्टेशनवर उतरले, मात्र कार्यकर्त्यांनी दुसऱ्याच व्यक्तीचे जंगी स्वाग केले.
Kanpur Lok Sabha Election: आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशातील कानपूरमधून रमेश अवस्थी यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाने विद्यमान खासदार सत्यदेव पचौरी यांना डच्चू देत अवस्थींवर विश्वास दाखवला. दरम्यान, अवस्थी यांच्यासोबत कानपूर रेल्वे स्टेशनवर एक विचित्र घटना घडली. तिकीट जाहीर झाल्यानंतर ते पहिल्यांदाच रेल्वेद्वारे कानपूर स्टेशनवर उतरले. यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मोठा घोळ घातला.
रमेश अवस्थी यांच्यासाठी स्टेशनवर मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते जमले होते. शताब्दी एक्स्प्रेस स्टेशनवर थांबताच उत्साही कार्यकर्ते स्वागतासाठी बोगीकडे धावले. यावेळी ट्रेनमधून अवस्थी यांच्या आधी भलताच व्यक्ती खाली उतरला. गोंधळून गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीलाच रमेश अवस्थी समजून पुष्पहार घालून जंगी स्वागत केले.
BJP candidate Ramesh Awasthi gets misidentified by party workers upon his arrival in Kanpur. Before he could even step out of the train coach, a person resembling him appeared outside, causing the party workers to mistake him for Awasthi and started chanting and greeting the man. pic.twitter.com/4KyUFYUUu7
— IANS (@ians_india) March 27, 2024
काही वेळाने घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना रमेश अवस्थी मागे असल्याचे समजले. यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांना पुष्पहार घालण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपचे कार्यकर्तेही आपला नवा उमेदवार ओळखू शकले नाहीत, असा टोला नेटकरी लगावत आहेत. दरम्यान, रमेश अवस्थी समजून ज्या व्यक्तीला पुष्पहार घातला, ते दुसरे तिसरे कोणी नसून भाजपचेच राज्यसभा खासदार बाबू राम निषाद होते.
कोण आहेत रमेश अवस्थी ?
यावेळी भाजपने कानपूर लोकसभा मतदारसंघातून सत्यदेव पचौरी यांचे तिकीट कापून, रमेश अवस्थी यांच्यावर बाजी लावली आहे. रमेश अवस्थी हे ज्येष्ठ पत्रकार राहिले आहेत. नुकताच त्यांनी सहारा समूहाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर भाजपनेही त्यांना कानपूरमधून लोकसभेचे तिकीट दिले. कानपूर लोकसभा जागेसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी 4 जून रोजी होईल.