IIT-BHU व्हिडिओ प्रकरणी भाजपाची कारवाई, तिन्ही आरोपींना पक्षातून काढलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 10:46 PM2023-12-31T22:46:43+5:302023-12-31T22:48:14+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी वाराणसीत तरुणीच्या छेडछाडीची घटना घडली होती
लखनौ - वारणसी येथील आयआयटी बीएचयू इथं शिक्षण घेणाऱ्या तरुणीची छेड काढून नंतर नग्न व्हिडिओ बनवल्याप्रकरणी तब्बल दोन महिन्यांनंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि आनंद चौहान अशी आरोपींची नावे आहेत. या नराधमांनी तरुणीचा लैंगिक छळ करत नंतर जबरदस्तीने तिचा नग्न व्हिडिओ काढला होता. याप्रकरणात अटक केलेले तीनही आरोपी भाजपच्या बड्या नेत्यांशी संबंधित असून ते भाजपच्या आयटी सेलचे पदाधिकारीही असल्याचं समोर आलं आहे. मात्र, आता भाजपाने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी वाराणसीत तरुणीच्या छेडछाडीची घटना घडली होती. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी या प्रकरणातील आरोपी भाजप नेत्यांच्या जवळचे असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप केला होता. त्यानंतर अजय राय यांच्याविरोधातच तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, आता आरोपी हे भाजपशी संबंधित असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर अजय राय यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपविरोधात जोरदार हल्लाबोल केला. या घटेनंतर पोलिसांनी ३ महिन्यानंतर आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर, भाजपाने तिनही आरोपींना पक्षातून बडतर्फ केले आहे.
भाजपाने तिन्ही आरोपींना पक्षातून काढून टाकले आहे. मात्र, ते तिघे पक्षात कोणत्या सेलमध्ये आणि कुठल्या पदावर काम करत होते, त्याचा कुठेही उल्लेख केला नाही. वारणसी भाजपा जिल्हाध्यक्ष हंसराज विश्वकर्मा यांनी आरोपींना पक्षाने बडतर्फ केले असून पुढील कारवाई पार्टीच्या निर्देशानुसारच केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, याप्रकरणी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांनाही १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमकं काय घडलं?
बीएचयू आयआयटी परिसरात १ नोव्हेंबर रोजी तीन तरुणांनी विद्यार्थिनीचा न्यूड व्हिडिओ तयार केला होता. हा प्रकार समोर येताच आयआयटी परिसरात विद्यार्थ्यांनी मोठं आंदोलन केलं. त्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी ३७६ (डी) कलमान्वये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र बरेच दिवस उलटल्यानंतरही आरोपींच्या अटकेची कारवाई करण्यात आली नव्हती.
दरम्यान, भाजप नेत्यांच्या दबावामुळेच पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नव्हती. मात्र स्थानिक पोलिसांतील काही अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर आता अटकेची कारवाई करण्यात आली आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी म्हटलं आहे.