राम मंदिर अन् CM योगींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी, FIR दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 09:45 PM2023-12-31T21:45:41+5:302023-12-31T21:48:27+5:30
लखनौ येथील सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याच्या दुसऱ्याचदिवशी अयोध्येतील प्रभू श्रीराम यांचे मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तसेच, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह उत्तर प्रदेश एटीएसचे प्रमुख अमिताभ यश यांनाही बॉम्ब हल्ल्यात ठार करण्यात येणार असल्याची धमकी ई-मेलच्या माध्यमातून देण्यात आली आहे. स्वत:ला आयएसआय संघटनेशी संबंधित असल्याचे सांगत, या वक्तीने ई-मेलद्वारे ही धमकी दिली आहे. राष्ट्रीय किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना हा ई-मेल प्राप्त झाला आहे.
लखनौ येथील सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय किसान मंच आणि राष्ट्रीय गो परिषदेशी संबंधित देवेंद्र तिवारी यांना २७ डिसेंबर रोजी दुपारी २.०७ वाजता एक ई-मेल आला आहे. त्यामध्ये, आपत्तीजनक शब्दांचा वापर करण्यात आला असून आरोपीने अयोध्येतील श्रीराम मंदिर, युपीचे सीएम योगी आदित्यनाथ आणि एटीएस प्रमुख अमिताभ यश यांना बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल पाठवणाऱ्याचे नाव जुबेर हुसैन (खान) असल्याचे सांगण्यात येत आहे.
संबंधित व्यक्ती आयएसआय या दहशतवादी संघटनेशी निगडीत असून तीन लोकांमुळे तो त्रस्त असल्याचे त्याने म्हटले आहे. याप्रकरणी, देवेंद्र तिवारी यांनी ट्विटरवरुन मेसेज लिहिला आहे. मला जुबेर खान नामक व्यक्तीचा ई-मेल प्राप्त झाला आहे. त्यामध्ये, अयोध्येतील श्रीराम मंदिर, युपीचे सीएम योगी आदित्यनाथ आणि एटीएस प्रमुख अमिताभ यश व मला बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या मेलच्या पत्राची कॉपी मी शेअर करत सुरक्षेची आणि तपासाची मागणी करत असल्याचं देवेंद्र यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.
दरम्यान, युपीच्या पोलिसांनी ११२ सेवेतील पोलिसाच्या फिर्यादीनुसार एफआयआर दाखल केले आहे. लखनौ पोलिसांसह एटीएस पथकही या घटनेचा तपास करत आहे. आयपी एड्रेसद्वारे ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे. देवेंद्र यांनी अवैध कत्तलखान्यांविरुद्ध न्यायालयात पीआयएल दाखल केले आहे. त्यामुळेच, त्यांना सातत्याने अशा धमक्या येत असल्याचं समजते. मात्र, पोलिसांनी अद्यापही आरोपीला ट्रेस केले नाही.