लाहोरची वधू, जौनपूरचा वर, भाजपा नेत्याच्या मुलाचा पाकिस्तानमधील तरुणीशी ऑनलाईन निकाह
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2024 11:49 AM2024-10-20T11:49:26+5:302024-10-20T11:49:54+5:30
Online Nikah: उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यात सध्या एका अजब लग्नाची गजब गोष्ट चर्चेत आहे. येथील एका भाजपा नेत्याच्या मुलाने पाकिस्तानी तरुणीसोबत ऑनलाइन निकाह केला आहे.
उत्तर प्रदेशमधील जौनपूर जिल्ह्यात सध्या एका अजब लग्नाची गजब गोष्ट चर्चेत आहे. येथील एका भाजपा नेत्याच्या मुलाने पाकिस्तानी तरुणीसोबत ऑनलाइन निकाह केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जौनपूरमधील भाजपा नगरसेवक तहसीन शाहीद यांनी त्यांच्या मुलाचा निकाह लाहोरमध्ये करण्याचे ठरवले होते. मात्र त्यांना व्हिसा मिळू शकला नाही. त्यामुळे या वधू-वरांचा ऑनलाइन निकाह लावून देण्यात आला.
जौनपूर येथील भाजपाचे नगरसेवक तहसीन शाहीद यांनी त्यांचा मोठा मुलगा मोहम्मद अब्बास हैदर याचा निकाह पाकिस्तानमधील लाहोर येथील अंदलीप जहरा हिच्यासोबत ठरवला होता. नियोजनानुसार हा निकाह पाकिस्तानमध्ये होणार होता. त्यासाठी त्यांनी व्हिसा मिळावा म्हणून अर्जदेखील केला होता. मात्र दोन्ही देशांमध्ये असलेल्या राजकीय तणावामुळे वराला व्हिसा मिळू शकला नाही.
यादरम्यान, वधूची आई राणा यास्मिन झैदी ही आजारी पडली. तिला रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. ही परिस्थिती पाहून हा निकाल ऑनलाइन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
शुक्रवारी रात्री वर हैदर याच्यासह वरपक्षाकडील मंडळी एका इमामवाड्यात एकत्र जमले आणि ऑनलाइन निकाहामध्ये सहभागी झाले. तर वधूच्या कुटुंबीयांनी लाहोरमधून या विवाह सोहळ्यात सहभाग घेतला. शिया धार्मिक नेते मौलाना महफुजूल हसन यांनी सांगितले की, इस्लाममध्ये निकाहसाठी महिलेची मान्यता आवश्यक असते, त्याबाबत ती मौलानांना सांगते. जेव्हा दोन्ही बाजूचे मौलाना एकाचवेळी समारंभ आयोजित करतात, तेव्हाच ऑनलाइन निकाह तेव्हाच शक्य आहे.
हैदर याने सांगितले की, माझ्या पत्नीला कुठल्याही अडचणीशिवाय भारताचा व्हिसा मिळेल, अशी अपेक्षा आहे. या निकाहात आमदार ब्रिजेश सिंह प्रिशू आणि इतर नेते सहभागी झाले होते.