बृजभूषण सिंह अडचणीत! सहापैकी चार महिला कुस्तीपटूंनी व्हिडीओ, पुरावे दिले; उद्या चार्जशीट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 10:37 AM2023-06-14T10:37:08+5:302023-06-14T10:37:28+5:30
लोकसभा निवडणुकाचा काळ आहे. यामुळे हे आरोप खरे ठरले तर ते बृजभूषण यांना परवडणारे नाहीय.
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटुंनी पुरावे दिले आहेत. महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या महिलांनी अनेक ऑडिओ व्हिडिओ दिल्ली पोलिसांना दिले आहेत. यामुळे बृजभूषण सिंहांच्या अडचणी वाढणार आहेत.
लोकसभा निवडणुकाचा काळ आहे. यामुळे हे आरोप खरे ठरले तर ते बृजभूषण यांना परवडणारे नाहीय. दिल्ली पोलिसांना या प्रकरणात १५ जूनपर्यंत चार्जशिट फाईल करायची आहे. बृजभूषण यांच्यावर आरोप करणाऱ्या सहापैकी चार कुस्तीपटूंनी पुरावे जमा केले आहेत.
या महिलांनी बृजभूषण यांच्यावर चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. यानंतर पोलिसांनी आरोपांचे पुरावे देण्यास सांगितले होते. रविवारी या महिलांनी पोलिसांकडे ऑडिओ-व्हिडीओ पुरावे म्हणून दिले आहेत.
पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत २०० हून अधिक लोकांचे जबाब नोंदविले आहेत. यामध्ये तक्रारदार कुस्तीपटू, कोच, रेफरी आणि बृजभूषण यांचे सहकारी सहभागी होते. दिल्ली पोलिसांनी पाच देशांच्या कुस्ती महासंघांकडून मदत मागितलेली आहे. त्यांच्याकडून दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ, फोटो आदी गोष्टी मागविल्या आहेत.
इंडोनेशिया, बल्गेरिया, कझाकिस्तान, मंगोलिया आणि किर्गिस्तानमध्ये झालेल्या स्पर्धांदरम्यान महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. दिल्ली पोलिसांनी या देशांच्या कुस्ती महासंघांना पत्र लिहून स्पर्धेचे व्हिडिओ फुटेज आणि खेळाडूंच्या मुक्कामाचा व्हिडिओ देण्याची विनंती केली आहे.या देशांच्या कुस्ती महासंघांकडून मागितलेला तपशील १५ जूनपर्यंत मिळू शकत नाही, असे पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे नंतरचे पुरावे हे पुरवणी आरोपपत्रात दाखल करण्यात येणार आहेत.