अयोध्येतील राम मंदिरच्या आसपासच्या घरांबाबत मोठा निर्णय, विशेष कॅफेटेरिया विकसित केला जाणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 03:43 PM2023-08-03T15:43:05+5:302023-08-03T15:43:27+5:30
अयोध्येला अत्याधुनिक शहर बनवण्याच्या निर्णयाअंतर्गत रामजन्मभूमीच्या आसपासच्या घरांच्या छतावर कॅफेटेरिया (Cafeteria)विकसित करण्यात येणार आहेत.
जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येतील राम मंदिर भाविकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे. राम मंदिराचे सुमारे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून सांगण्यात आले आहे. तसेच, पुढील वर्षी १६ ते २४ जानेवारी दरम्यान अयोध्येतील भव्य मंदिराच्या गर्भगृहात रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ मागितली आहे. दरम्यान, आता अयोध्येला अत्याधुनिक शहर बनवण्याच्या निर्णयाअंतर्गत रामजन्मभूमीच्या आसपासच्या घरांच्या छतावर कॅफेटेरिया (Cafeteria)विकसित करण्यात येणार आहेत.
मंदिराच्या सभोवतालचा परिसर ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रतिकांनी सुशोभित केला जाईल आणि जन्मभूमी मार्ग व भक्ती मार्गावरील जवळच्या घरांच्या छतावर विशेष कॅफेटेरिया विकसित केले जाईल, असे अयोध्येचे विभागीय आयुक्त गौरव दयाल यांनी गुरुवारी सांगितले. दरम्यान, अयोध्या प्रशासनाशी संबंधित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, 'अयोध्या विकास प्राधिकरण (ADA) इच्छुक घरमालकांना त्यांच्या घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी आणि एजन्सींसोबत कराराच्या माध्यमातून छतावरील कॅफेटेरिया बांधण्यासाठी प्रोत्साहित करेल.'
प्रसारमाध्यमांशी बोलताना विभागीय आयुक्त गौरव दयाल म्हणाले, 'एडीएच्या पॅनेलद्वारे आवश्यक परवानग्या आणि संबंधित प्रक्रिया सुलभ केल्या जातील. अयोध्येत येणार्या भाविकांना रामजन्मभूमीच्या आजूबाजूच्या घरांच्या छतावर बनवलेल्या कॅफेटेरिया किंवा ओपन एअर रेस्टॉरंटमधून श्री राम मंदिराचे मनमोहक दृश्य पाहता येणार आहे. तसेच, भगवान रामांच्या भव्य मंदिराच्या उभारणीसोबतच अयोध्येला पौराणिक वैभवानुसार सजवण्यात येत आहे. यासोबतच अयोध्येत विविध विकासात्मक उपक्रम राबवले जात आहेत, असे गौरव दयाल यांनी सांगितले.
मंदिराचे सुमारे ७० टक्के बांधकाम पूर्ण
अयोध्येतील राम मंदिराच्या दर्शनाची वेळ जवळ येत आहे. अयोध्येतील राम मंदिराचे सुमारे ७० टक्के बांधकाम पूर्ण झाल्याचे श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे निवेदन आले आहे. तसेच, या वर्षी डिसेंबरपर्यंत मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ट्रस्टने कामगार आणि तंत्रज्ञांची संख्या वाढवली आहे. आता वेगवेगळ्या शिफ्टमध्ये चोवीस तास बांधकाम सुरू आहे. पुढील वर्षी १६ ते २४ जानेवारी दरम्यान अयोध्येतील भव्य मंदिराच्या गर्भगृहात रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. तसेच, पुढील वर्षी जानेवारीत हे मंदिर भाविकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.