सीमा-अंजू प्रकरण रिव्हर्स लव्ह जिहाद आहे का? योगी आदित्यनाथ म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 09:41 PM2023-07-31T21:41:55+5:302023-07-31T21:42:41+5:30
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सीमा आणि अंजूबद्दल भाष्य केले आहे.
सध्या देशात दोन लव्ह स्टोरीजची जोरदार चर्चा होत आहे. एक सीमा हैदरची आहे, जी आपला भारतीय प्रियकर सचिन मीना याला भेटण्यासाठी पाकिस्तानातून ग्रेटर नोएडाला आली आहे, तर दुसरी लव्ह स्टोरी भारतीय अंजूची आहे, जिने पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा येथे जाऊन आपल्या प्रियकराशी लग्न केले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही सीमा आणि अंजूबद्दल भाष्य केले आहे.
योगी आदित्यनाथ यांना पॉडकास्टमध्ये विचारण्यात आले की, सीमा हैदरने तुम्हाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानात न पाठवण्याचे आवाहन केले आहे. तसेच, काही लोकांनी PUBG च्या माध्यमातून या प्रेमाला रिव्हर्स लव्ह जिहाद असे नाव दिले आहे. याबाबत तुम्हाला काय म्हणायचे आहे? यावर योगी आदित्यनाथ म्हणाले, सुरक्षा यंत्रणांकडून तपास केला जात आहे. तपासातून जो अहवाल समोर येईल, त्यानुसार योग्य तो विचार केला जाईल. याचबरोबर, पाकिस्तानला गेलेली भारतीय महिला अंजूबाबत योगी आदित्यनाथ म्हणाले की, यावरही सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवून आहे. हे प्रकरण दोन देशांशी संबंधित आहे. तपास यंत्रणा यावर काम करत आहेत.
दरम्यान, सीमा हैदर ही पाकिस्तानी गुप्तहेर आहे, असा संशय काही लोकांकडून व्यक्त केला जात आहे. पण हे अजून सिद्ध झालेले नाही. याबाबत भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सीमा हैदरची चौकशीही करण्यात येत आहे. उत्तर प्रदेश एटीएसने अलीकडेच सीमा, सचिन आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. दुसरीकडे, वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात पोहोचलेल्या अंजूचे प्रियकर नसरुल्लासोबत अंजूचे लग्न झाल्याची बातमी आहे. तिने धर्मांतर केल्याचीही चर्चा आहे.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी महिला सीमा हैदर आपल्या चार मुलांसह भारतात आली आहे, तर अंजू आपल्या मुलांना आणि पतीला सोडून पाकिस्तानला गेली आहे. सीमा हैदर सध्या सचिनच्या कुटुंबासोबत ग्रेटर नोएडामध्ये राहत आहे, तर अंजूचे नवीन व्हिडिओ समोर येत आहेत. एका व्हिडिओमध्ये अंजू तेथील पारंपारिक पोशाखात दिसत आहे, तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये ती प्री-वेडिंग शूट करताना दिसत आहे.