दुकानांवर 'नेमप्लेट'च्या निर्णयाने वाद, भाजपचे 3 सहकारी पक्ष UP सरकारच्या आदेशाविरोधात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 19:48 IST2024-07-19T19:45:07+5:302024-07-19T19:48:37+5:30
कांवड यात्रा मार्गांवर दुकानाचे नाव आणि दुकानदाराचे नाव लिहिण्यासंदर्भातील उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशाला आता भाजपचे सहकारी पक्षच विरोध दर्शवू लागले आहेत.

दुकानांवर 'नेमप्लेट'च्या निर्णयाने वाद, भाजपचे 3 सहकारी पक्ष UP सरकारच्या आदेशाविरोधात!
कांवड यात्रा मार्गांवर दुकानाचे नाव आणि दुकानदाराचे नाव लिहिण्यासंदर्भातील उत्तर प्रदेश सरकारच्या आदेशाला आता भाजपचे सहकारी पक्षच विरोध दर्शवू लागले आहेत. जेडीयू, एलजेपी आणि आरएलडी या तीन पक्षांनी उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाला विरोध केला आहे.
यासंदर्भात बोलताना जेडीयूचे सरचिटणीस केसी त्यागी म्हणाले, उत्तर प्रदेशपेक्षाही मोठी कांवड यात्रा बिहारमध्ये निघते. मात्र, तेथे असा कोणताही आदेश नाही. पीएम मोदी म्हणतात सबका साथ सबका विकास, हे सर्वांनी मान्य करायला हवे. एवढेच नाही, तर लादण्यात आलेले निर्बंध हे पीएम मोदींच्या घोषणे विरोधात आहेत. योगी सरकारने या निर्णयाचा विचार करायला हवा.
आरएलडीचे सरचिटणीस त्रिलोक त्यागी म्हणाले, राजकारणात धर्म किंवा जात नसावी. हे योग्य नाही. दुकानांबाहेर नावे लिहिण्याची परंपरा चुकीची आहे. कुठून खरेदी करायची ही जनतेची इच्छा. दारू पिल्याने धर्म भ्रष्ट होत नाही का? की केवळ मांसामुळेच धर्म भ्रष्ट होतो? यूपीचे मंत्री दारूवर का बोलत नाहीत? गरिबांच्या दुकानांकडे बोट दाखवतात, मग दारूवर कारवाई का नाही? मुस्लीम तर कानवड यात्रेत फुलांचा वर्षाव करतात.
याशिवाय, केंद्रीय मंत्री आणि भाजपचे सहकारी चिराग पासवान म्हणाले, आपण मुझफ्फरनगर पोलिसांकडून दुकान आणि दुकानदाराचे नाव सांगण्यासंदर्भातील निर्णयाचे समर्थन करत नाही. जेव्हा, जात अथवा धर्माच्या नावावर विभाजन होते, तेव्हा मी त्याचे कदापी समर्थन करत नाही.