प्रेमाला 'सीमा' नाही! प्रेमी युगुल एक महिना झाले बेपत्ता; अखेर घरच्यांची कबुली पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 07:52 PM2024-04-10T19:52:14+5:302024-04-10T19:52:23+5:30
प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही.
प्रेम आंधळं असतं प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही, असं नेहमी बोललं जातं. पण याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील प्रेमी युगुलानं घरच्यांचा विरोध डावलून लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी दोघे फरार देखील झाले मग पोलिसांच्या मध्यस्थीमुळं त्यांचं लग्न लागलं. संबंधित तरूणी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती. मात्र, तोपर्यंत या दोघांनी राज्याची सीमा ओलांडली होती. अखेर हे प्रेमी युगुल गुजरातमध्ये सापडलं.
दरम्यान, पोलिसांनी नातेवाईकांना माहिती देताच त्यांनी जवळच्या मंदिरात लग्न लावण्याचा निर्णय घेतला. कानपूर येथील बैजू पुरवा या गावातील प्रवीण याचं जवळच्या गावातील तरूणीशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी आपापल्या घरी याची माहिती दिली होती. पण, घरच्यांचा विरोध पाहता त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.
अखेर घरच्यांची कबुली
१० मार्च रोजी प्रवीण प्रेयसीला घेऊन गुजरातमधील अहमदाबाद इथं गेला. प्रेयसीच्या घरच्यांनी सगळीकडं तपास करूनही ती सापडली नसल्यानं पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी बेपत्ता म्हणून तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला. एक महिन्यानंतर ८ एप्रिल रोजी पोलिसांना हे प्रेमी युगुल सापडलं. यानंतर दोघांशी चर्चा करून त्यांना समज देण्यात आली. मग पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं. पोलिसांनी सांगितल्यानंतर दोन्ही बाजूच्या नातेवाईकांनी लग्नास होकार दिला. यानंतर एका मंदिरात विवाहसोहळा पार पडला. खरं तर लग्नासाठी घरच्यांची कबुली मिळाली असली तरी यामुळं त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.