Crime: भाजपा नेत्यावर बहिणीनेच करवला गोळीबार, दिली ६ लाखांची सुपारी, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2023 05:36 PM2023-08-28T17:36:23+5:302023-08-28T17:38:55+5:30
Crime News: उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे रविवारी रात्री पोलीस आणि काही सराईत गुंडांमध्ये चकमक झाली. दोन्हीकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला. या गोळीबारात दोन गुंडांना गोळ्या लागून ते जखमी झाले. त्यानंतर जी माहिती समोर आली ती धक्कादायक होती.
उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे रविवारी रात्री पोलीस आणि काही सराईत गुंडांमध्ये चकमक झाली. दोन्हीकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार झाला. या गोळीबारात दोन गुंडांना गोळ्या लागून ते जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या गुंडांवर अटकेची कारवाई करून पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये या चार गुंडांनी धक्कादायक दावा केला आहे. भाजपा नेते राकेश कुशवाहा यांच्या हत्येसाठी त्यांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे. राकेश कुशवाहा हे भाजपाच्या सामाजिक न्याय मोर्चा (ब्रज क्षेत्र)चे माजी मंत्री आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे राकेश कुशवाहा यांच्या हत्येसाठी दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर त्यांची बहिणी हेमलता आणि भाओजी रामकुमार यांनी सुपारी दिली होती. राकेश यांचा बहीण हेमलतासोबत एक शाळा आणि आणखी एका मालमत्तेवरून विवाद सुरू आहे. या वादातूनच राकेश यांचे वडील मथुरा प्रसाद यांची २०१६ मध्ये चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. मथुरा प्रसाद यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी त्यांच्या दोन्ही मुलींना अटक केली होती. या दोन्ही मुली ह्या राकेश कुशवाहा यांच्या भगिनी आहेत.
तुरुंगातून बाहेर येताच हेमलता आणि तिचे पती रामकुमार यांनी भाजपा नेते राकेश यांची हत्या करण्याचा कट रचला. त्यासाठी हेमलता आणि तिच्या पतीने एका सराईताला सुपारी दिली. त्यानंतर या गुंडांच्या टोळीने १६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता राकेश यांच्या घराकडे जाऊन त्यांच्यावर गोळीबार केला होता.
दुचाकीवरून आलेल्या दोघा सराईत गुंडांना राकेश यांना जिवे मारण्याच्या इराद्याने गोळीबार केला. मात्र त्यांचा नेम चुकला. बंदुकीतून निघालेल्या गोळ्या राकेश यांच्या हाताला लागल्या. त्यामुळे ते जखमी झाले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, ही घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली होती.
या घटनेनंतर पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत होते. दरम्यान, काल रात्री भाजपा नेत्यावर हल्ला करणारे आरोपी हे ट्रान्सपोर्टनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी परिसराला घेराव घातला. तेवढ्यात तिथे दुचाकीवरून पोहोचलेल्या सराईतांनी गोळीबार केला. तर पोलिसांनी प्रत्युत्तरदाखल केलेल्या गोळीबारामध्ये दोन हल्लेखोर जखमी झाले. त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.